esakal | ऑक्सिजन तुडवड्यानंतर आता लसीचा गोंधळ

बोलून बातमी शोधा

vaccine
ऑक्सिजन तुडवड्यानंतर आता लसीचा गोंधळ; शहरात लसीकरण थांबले
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस टोचण्याची मोहीम सुरु केली असून गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या मोहिमेत अवघे २३ टक्के लसीकरण झाले असताना आता शहरातील सर्वच केंद्रांवरचे लसीकरण पुरवठ्याअभावी थांबले आहे. शनिवारी (ता.२४) संध्याकाळपर्यंत नाशिक शहरासाठी लस उपलब्ध होतील. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरवात होईल, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

शहरात लसीकरण पूर्णपणे ठप्प

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनचे डोस देण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. नाशिक शहरात सोळा जानेवारीपासून मोहीम हाती घेण्यात आली. राज्य शासनाकडून जिल्हा रुग्णालयाकडे कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त होतात. जिल्हा रुग्णालयाकडून महापालिकेला डोस वितरित केले जातात. आतापर्यंत महापालिकेला दोन लाख ४५ हजार ६१० डोस प्राप्त झाले त्यातील सर्वच डोस नागरिकांना देण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १४ लाख ८५ हजारच्या वर आहे. झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये देशात नाशिक चौथ्या क्रमांकाचे शहर असल्याने लोकसंख्या देखील तेवढ्याच प्रमाणात वाढल्याचा अंदाज आहे. साधारण वीस लाखांचा आकडा लोकसंख्येने गाठल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या लसीकरणाचा विचार करताना २३ टक्के लसीकरण झाल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारीला पोलिस कोठडी; नाशिक न्यायालयाने सुनावला निर्णय

उद्यापर्यंत लस प्राप्त झाल्यास सोमवारपासून सुरु

गेल्या आठवड्यात महापालिकेकडे १५ हजार २८६ डोस शिल्लक होते. नाशिककरांचा कोव्हिशिल्ड लसीला प्रतिसाद असल्याने कोव्हिशिल्ड समाप्त झाल्या आहेत. कोव्हॅक्सिनचे काही डोस शिल्लक होते. शुक्रवारी (ता.२३) दुपारी चार केंद्रावर कोव्हॅक्सिनचे लसीकरण झाले, परंतु ते डोसदेखील संपुष्टात आल्याने लसीकरणाची मोहीम पूर्णपणे शहरात थांबली आहे.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

कोव्हिशिल्ड तीन दिवसांपूर्वीच संपुष्टात

कोव्हिशिल्डचे प्राप्त झालेले डोस तीन दिवसांपूर्वीच संपुष्टात आले होते. कोव्हॅक्सिनचे शिल्लक डोस देण्याचे काम चार केंद्रांवर सुरु होते. परंतु ते डोस देखील संपल्याने लसीकरण थांबविण्यात आले आहे. महापालिकेचे २७ व खासगी २२ केंद्रांवर लसीकरण सुरु होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत लस प्राप्त होतील. रविवारी केंद्रांवर वितरण झाल्यानंतर सोमवार (ता. २६) पासून लसीकरण पुर्ववत सुरु होईल अशी माहिती डॉ. अजिता साळुंखे यांनी दिली.