
Nashik News : वणी ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाख! कराच्या रूपाने मिळणार महसूल
वणी (जि. नाशिक) : वणी ग्रामपंचायत हद्दीत भरणारा आठवडे बाजार तसेच, रोजच्या बाजार कर वसुलीच्या माध्यमातून जवळपास ५० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. (Vani Gram Panchayat will get 50 lakhs Revenue in form of tax Nashik News)
येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता.२९) वणी ग्रामपंचायतीच्यावतीने आठवडे बाजारात येणारे व्यापारी शेतकरी यांच्याकडून कर वसुलीकरिता लिलाव करण्यात आला. रोज बाजारात कर वसुली केली जाते. दोन्हींचा लिलाव करण्यात आला.
आठवडे बाजार कर वसुलीचा लिलाव हा ३२ लाख ३५ रुपये, डेली बाजार लिलाव ९ लाख ५१, तर ग्रामपंचायतींच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांचा पाच वर्षांसाठी ८ लाख ८१ हजाराला झाला. या माध्यमातून ग्रामपंचायतीला पन्नास लाखाचे उत्पन्न मिळणार आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
रोजच्या बाजारातून कर वसुली किंवा आठवडे बाजाराची कर वसुली असो ही नियमानुसार करावे असे सर्वसामान्यांचे मत आहे. बऱ्याच वेळा शेतकरी, व्यापारी यांच्याकडून अन्यायकारक कर वसुली करण्यात येते हे प्रकार होता कामा नये.
रीतसर पावती ही प्रत्येकाला दिली पाहिजे अशा सूचना लिलाव प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे देण्यात आल्या. सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.