
Viral Fever : शहरात ताप, सर्दी-खोकल्याची साथ; दुखणे अंगावर न काढता उपचाराचे तज्ज्ञांचे आवाहन
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदल आणि नव्याने आलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन सर्दी-खोकला, ताप-थंडीचे रुग्ण शहर-जिल्ह्यात वाढले आहेत.
यासंदर्भात, वातावरणातील विपरीत बदलामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ताप-थंडी व सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने रुग्णांनी हे दुखणे अंगावर न काढता तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अन्यथा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आलेले आहे. (Viral Fever in city accompanied by cold cough Experts call for treatment precaution nashik news)
गेल्या दोन आठवड्यांमध्ये वातावरणात बदल झाल्याने त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर झाला आहे. प्रामुख्याने लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. घसादुखीपासून सुरवात होऊन थंडी-ताप, सर्दी-खोकल्याचा त्रास होतो.
असा त्रास जाणवल्यानंतर रुग्णांनी तात्पुरत्या स्वरूपाचा इलाज न करता तत्काळ आपले फॅमिली फिजिशियन डॉक्टर वा तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे. जेणेकरून वेळेवर उपचार मिळाल्यास व्हायरल इन्फेक्शनची तीव्रता कमी करता येऊ शकेल असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
थंडी वाजून येऊन ताप येणे, घसा दुखीनंतर सर्दी व खोकला येतो. ही प्राथमिक लक्षणे आल्यानंतर उपचार सुरू केल्यानंतर साधारणत: चार दिवस त्रास होईल. तसेच, त्यानंतर बारीक ताप राहू शकतो. त्याचप्रमाणे, खोकल्याचा त्रास आठवडाभर राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रुग्णांनी या काळात घराबाहेर जाणे टाळावे, गर्दीत जाऊ नये, घराबाहेर जावे लागलेच तर मास्कचा वापर करावा व कोरोना काळात पंचसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेले आहे.
लक्षणे
- थंडी वाजून ताप येणे. - वारंवार खोकला येणे. - अशक्तपणा वाटणे. - डोळ्यांची जळजळ होणे. - घसा दुखणे
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
हे कराच
- कोरोनातील पंचसूत्रीचा अवलंब करावा
- संतुलित आहार घ्यावा
- गर्दीत जाताना मास्कचा वापर करावा
- तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा
"थंडी-ताप, सर्दी-खोकल्याची लक्षणे जाणवताच मेडिकल स्टोअरमधून गोळ्या घेण्याऐवजी आपल्या फिजिशियनकडे जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावा. एकामुळे घरातील सर्वांना संसर्ग होतो आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढते आहे. परंतु यात घाबरून जाण्यासारखे नाही. रुग्णांनी घराबाहेर जाणे टाळावे आणि पूर्ण वाटेपर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये."
- डॉ. प्रतीक भामरे, एमडी, मेडिसीन.
"वातावरणातील बदलाचा परिणामामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णांनी घाबरून न जाता कोरोनातील पंचसूत्रीचा वापर करावा. गर्दी टाळावी, मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत, संतुलित आहार घ्यावा आणि पुरेशी झोप घ्यावी. मधुमेही व रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी." - डॉ. अनंत पवार, विभागीय वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय.