Water Crisis : गंगापूर धरणात चर खोदणार! पाणीटंचाईच्या झळा; 12 टँकरने शहराला पाणीपुरवठा | Water Crisis Gangapur dam will dug Water shortages Water supply to city by 12 tankers nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gangapur Dam

Water Crisis : गंगापूर धरणात चर खोदणार! पाणीटंचाईच्या झळा; 12 टँकरने शहराला पाणीपुरवठा

Water Crisis : शहरात अघोषित पाणीकपात सुरू करण्यात आल्यानंतर संभावित पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने विभागनिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे बारा नवीन पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

धरणाची पातळी पंधरा मीटरपर्यंत खाली आल्यास धरणाच्या आतील पाणी पंपिंग स्टेशनपर्यंत आणण्यासाठी गंगापूर धरणात नवीन चर खोदण्याबरोबरच यापूर्वी खोदण्यात आलेल्या चरात साचलेला गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. (Water Crisis Gangapur dam will dug Water shortages Water supply to city by 12 tankers nashik news)

दक्षिण पॅसिफिक समुद्रात अल निओ वादळाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने हवामान विभागाने केंद्र सरकारला व केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळा लांबणार असल्याने त्याअनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

नाशिक महापालिकेने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करताना एप्रिल महिन्यात हप्त्यातून एक दिवस, तर जून महिन्यापासून हप्त्यातून दोन दिवस पाणीकपातीचे नियोजन केले. मात्र, पाणीकपात अद्याप सुरू झालेली नाही.

परंतु देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली एक दिवस पाणी बंद ठेवून अघोषित पाणीकपात सुरू केली आहे. आता महापालिकेने स्वमालकीचे ३१ विहिरी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला असून, गरज भासल्यास खासगी विहिरीदेखील ताब्यात घेतल्या जाणार आहेत.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १६० खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या एक हजार १८९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तातडीने खोदाई

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ३४ टक्के पाणीसाठा आहे. पाणीसाठा १४ ते १५ टक्क्यापर्यंत आल्यास पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोचत नाही. त्यामुळे चर खोदून धरणाच्या मध्य भागातून पंपिंग स्टेशनपर्यंत पाणी आणावे लागते.

२०१५ मध्ये अशाच प्रकारे पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळेस खोदण्यात आलेल्या चरात गाळ साचला आहे. गाळ काढण्यासाठी व चर खोदण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, पाणीटंचाई निर्माण झाल्यास कार्यारंभ आदेश देऊन तातडीने चर खोदण्याची कारवाई केली जाणार आहे.

सध्या विभागात प्रत्येकी एक टँकर

महापालिकेकडे सध्या सहा विभागात प्रत्येकी एक पाणी टँकर आहे. त्याद्वारे पाणीटंचाईची समस्या सोडविली जाते. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आता आणखीन प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा विभाग मिळून बारा पाण्याचे टँकर घेतले जाणार आहे.

त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून पाणीटंचाई निर्माण झाल्यास तातडीने कार्यारंभ आदेश देऊन टँकरची खरेदी केली जाणार आहे.

"गंगापूर धरणात चर खोदणे व बारा पाण्याचे टँकर खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. वेळेवर खरेदीची प्रक्रिया राबवता येत नसल्याने आत्ताच तयारी करून गरज भासल्यास तातडीने काम सुरू करता येणे शक्य आहे."

- शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग.