
Water Crisis : शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट; El Nino वादळामुळे हाय ॲलर्ट!
नाशिक : अवकाळी पावसामुळे शेती संकटात आली असतानाच आता शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट घोंघावत आहे. जून महिन्यात पॅसिफीक समुद्रात ‘अल निनो’ वादळ येणार असल्याने मोसमी पाऊस लांबेल.
त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या. त्यानुसार ऑगस्टअखेरपर्यंत धरणातील पाणी जपून वापरण्यासाठी नाशिककरांना कपातीला सामोरे जावे लागणार आहे. (Water shortage scarcity crisis on city dwellers High alert due to El Nino storm nashik news)
संभावित पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाकडून महापालिकेला प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने महापालिका मुख्यालयात पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती.
भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफिक समुद्रात ‘अल निनो’ वादळाचा अंदाज वर्तविला आहे. त्याचा परिणाम देशातील मॉन्सून पर्जन्यमानावर होण्याची दाट शक्यता असून, जून महिन्यानंतरदेखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना कराव्या लागणार आहे.
उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटा येण्याचेदेखील शक्यता आहे. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास विचारात घेता अचानक पाणीसाठा खालावू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थतीपेक्षा गंभीर होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई कृती आराखडा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेत पाणीपुरवठा विभागाची बैठक होऊन पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याबरोबरच संभावित पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
ऑगस्टमध्ये पाणीकपात
शासनाच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा विभागाने नुकताच आढावा घेतला. यात महापालिकेच्या ३१ विहीरी, तर १६० खासगी विहीरी आहे. संभावित टंचाईच्या पार्श्वभूमीवर विहीरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. त्याशिवाय ११८९ विंधन विहिरींची स्वच्छता, तसेच देखभाल व दुरुस्ती केली जाईल.
शहराला दररोज साधारण १९ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होतो. संभावित पाणीटंचाई लक्षात घेता ऑगस्ट महिन्यात जवळपास वीस ते २५ टक्के पाणी कपात करण्याचे नियोजन आहे. कमी पाणीपुरवठा होईल त्या भागात टँकरने पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
त्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र एक टँकर प्रस्तावित केला जाणार आहे. वेळेत पाऊस आल्यास मात्र पाणी कपात न करण्याचे नियोजन आहे.
संभावित पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सूचना
- जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यात पाणी टंचाईसाठी कृती आराखडा तयार करावा.
- पाणीटंचाई निवारणासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील यानुसार नियोजन करावे.
- उन्हाळ्यासह जुलै व ऑगस्ट या कालावधीत त्यांचे निवारण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा.
- पाण्याच्या स्रोतांचे जतन करावे.
- पाणीसाठ्याचा आढावा घेऊन आणि कपातीचे नियोजन करावे.
- पाणीटंचाई काळा रेन वॉटर हार्वेस्टिंग व कॅच द रेन पिण्याचे पाणी स्रोत बळकटीकरण योजना अभियान स्वरूपात राबवावी.
- वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करावे.
- हातपंप व विंधन विहिरी कार्यरत कराव्या.