मालेगाव पोलिस कारवाईत हिरो तपासात मात्र झिरो

Police
PoliceSakal

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यातील पोलिस महासंचालकांच्या (Director General of Police) आदेशानुसार सर्वत्र ‘मिशन ऑल आऊट’ (Mission All Out) मोहिम सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आदेशानुसार १६ डिसेंबरपासून ही मोहिम सुरु झाली असली तरी जिल्हा पोलिसांनी गेल्या काही महिन्यात अवैध दारु, गुटखा, चरस, शस्त्रास्त्र, कुत्तागोळी, परराज्यातील दारुवर धडाकेबाज पद्धतीने कारवाई केली. लाखोचा ऐवज जप्त करीत पोलिस कारवाईत हिरो झाले असले तरी गुन्ह्यांच्या तपासात (Detection) मात्र झिरो आहेत. तपासासाठीची यंत्रणा फोल ठरली आहे.

जिथे काही नाही तिथे कारवाई...

खबऱ्यांचे जाळे एकमेकांचा व हितशत्रूंचा काटा काढण्यासाठी कारवाईपुरते मर्यादीत झाले आहेत. गुन्ह्यांची उकल होत नसल्याने अथवा त्याकडे यंत्रणेचे फारसे लक्ष नसल्याने ‘जिथे काही नाही तिथे कारवाई’ अशी शंका घेण्यास वाव आहे.

Police
नाशिकसह 4 ठिकाणी मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; नितीन गडकरींची घोषणा

जिल्हा पोलिस यंत्रणेबद्दल अविश्‍वास?

शहरासह तालुक्यात दुचाकी चोरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. मालेगाव विभागातील विविध पोलिस ठाण्यात रोज किमान चार ते पाच दुचाकी चोरींचे गुन्हे दाखल होत आहेत. चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, रस्तालूट, गौणखनिज चोरी आदींचे प्रकारही वाढले आहेत. महिनाभरात दहापेक्षा अधिक ठिकाणी चोरी, घरफोड्या झाल्या. विविध पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. यंत्रणेने ठसे तज्ज्ञ, श्‍वानपथकांची मदत घेतली. ज्यांच्याकडे गुन्हा घडला ते गुन्ह्याचा छडा लागेल, या आशेवर आहेत. मात्र, पोलिसांना एखाद दुसरा दुचाकीचोर वगळता कुठल्याही गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आलेले नाही. त्यामुळे तपास यंत्रणा निकामी ठरत असल्याचा समज झाला असून, यंत्रणेबद्दल अविश्‍वास निर्माण झाला आहे. नाशिक शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरणाऱ्या ग्रामसेवकाला शिताफीने पकडले. जिल्हा पोलिस यंत्रणा याबाबत निष्क्रीय झाली आहे.

कारवाईत व्यस्त तपासात सुस्त

विशेष म्हणजे स्थानिक पोलिस ठाण्यात मनुष्यबळ कमी आहे. त्यातच शहरातील स्थिती, आंदोलने, बंदोबस्त, विविध उपक्रमात यंत्रणा गुरफटलेली असते. प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला जिल्हा पातळीवर क्राईम मिटींग होत असतात. प्रलंबित गुन्ह्यांची संख्या बघता या मिटींगमध्ये होते तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. स्थानिक पोलिस यंत्रणेला मदत व्हावी, अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी, कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात असावी, यासाठी मालेगाव विभागात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांचे खास पथक कार्यरत आहे. याशिवाय जिल्हा पोलिस अधिक्षकांचे पथक, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अपर पोलिस अधिक्षकांचे पथक, उपअधिक्षकांचे पथक अशी पाचहून अधिक पथके कार्यरत आहेत. याशिवाय स्थानिक प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये डीबी (DB - Detection Branch) पथक असते. मात्र, हे सर्व पथक कारवाईत व्यस्त असून, गुन्ह्यांची उकल व तपासात झिरो आहे. कारवाईदेखील प्रामुख्याने अवैध धंदे करणाऱ्यांच्या टिपमुळे अथवा आपापसातील वैयक्तिक हेवेदाव्यातूनच होत आहे. अन्यथा वारंवार आदेश होऊनही जिल्ह्यात अवैध धंदे, मटका, गुटखा, बायोडिझेल विक्री यासह सारे काही आलबेल सुरु आहे. यात होणारी उलाढाल थक्क करुन सोडणारी आहे.

Police
अमित शहा, पियुष गोयल, नितीन गडकरी यांच्या नावे बनावट लस प्रमाणपत्र!

कठोर कारवाई केल्यास अवैध धंद्यांना चाप

गुटखा, मटका, अवैध गोवंश हत्या हे अवैध धंदे व व्यवसाय पोलिस यंत्रणेच्या सहकार्याशिवाय चालूच शकत नाही. याची सर्वसामान्य नागरिकासह सर्वच घटकांना जाण आहे. काही प्रकरणात माहितीचे जाळे, चौकशीत सहकार्य व गुन्हेगारी तसेच कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. पोलिसांना अवैध धंदे व व्यावसायिकांची खडान्‌खडा माहिती असते. पोलिसांनी कठोरपणे कारवाई करण्याचे ठरविल्यास अवैध धंद्यांना चाप बसेल. ज्या पद्धतीने गल्ली बोळातील अवैध धंद्यांची पोलिस बारकाईने माहिती ठेवतात तिच यंत्रणा राबवून गुन्ह्यांची उकल व तपासावर लक्ष केंद्रीत केल्यास पोलिस सामान्य नागरीकांच्या धन्यवादास खऱ्या अर्थाने पात्र ठरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com