Nashik Crime News: हवामान केंद्राच्या कार्यालयाची तोडफोड; सुरक्षारक्षकाअभावी सुरक्षितता धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News: हवामान केंद्राच्या कार्यालयाची तोडफोड; सुरक्षारक्षकाअभावी सुरक्षितता धोक्यात

नाशिक : पेठरोडवरील हवामान केंद्राच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. १७) रात्री टवाळखोरांनी कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या कार्यालयासाठी सुरक्षारक्षक नसल्याने याठिकाणी टवाळखोरांकडून वारंवार चोरीच्या व धुडगूस घातल्याच्या घटना घडत असतात. यामुळे कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही सुरक्षितता धोक्यात आलेली आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Weather station office vandalized at pethroad Security threat due to lack of security guards Nashik Crime News)

याप्रकरणी नाशिक हवामान विभागातील कर्मचारी वैशाली वडनेरकर (रा. गांधीनगर, नाशिक) यांनी पंचवटी पोलिसात फिर्याद दिली आहे. मुंबई हवामान विभागांतर्गत पेठरोडवर नाशिक हवामान विभागाचे कार्यालय आहे.

या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी दोन शिफ्टमध्ये कामकाज करतात. मात्र, कार्यालयासाठी सुरक्षारक्षक नसल्याने याठिकाणी नेहमीच परिसरातील टवाळखोरांकडून चोऱ्यामाऱ्या केल्या जातात.

शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी बंद कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश करून कार्यालयातील स्वच्छतागृहातील पाच नळ, बेसिंग, ड्रेनेज पाइप व शॉवरची तोडफोड केली.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

यासह वॉटर कुलरचेही नुकसान केले. दुसऱ्या शिफ्टचे कर्मचारी कार्यालयात दाखल झाल्यावर ही बाब उघड झाली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. कार्यालयासाठी सुरक्षारक्षक नसल्याने कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

याचाच गैरफायदा घेत केंद्राच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून टवाळखोर प्रवेश करून चोऱ्या करतात. कार्यालयाच्या मागील बाजूने प्रवेश करून अँगल चोरी व इतर भुरट्या चोऱ्याही यापूर्वी झालेल्या आहेत. कार्यालयाला सुरक्षारक्षक नेमण्याबाबत मुंबई प्रादेशिक कार्यालयाकडे नाशिक हवामान केंद्रातर्फे पाठपुरावा केला जाणार आहे.