
Nashik News: नामफलकांच्या आड नेमकं दडलंय काय? सामाजिक कार्यकर्ते निलेश चिखले यांच्यासह नागरिकांचा सवाल
Nashik News : निफाड तालुक्याच्या पूर्व भागात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या विकास कामांना मंजुरी मिळालेली आहे. यापैकी काही रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे गेली असली, तरी काही रस्त्यांना अद्याप कार्यरंभ आदेश प्राप्त झालेले नाही.
सध्या सुरू असलेल्या कामांवर नामफलक लावणे बंधनकारक असताना ठेकेदारांनी जाणीवपूर्वक नामफलक लावलेले नाहीत. त्यामुळे तालुक्यात संभ्रमाचे वातावरण आहे. (What really hidden behind nameplates Social activist Nilesh Chikhle along with citizens question Nashik News)
कामांचे नेमके स्वरूप माहीत नसल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत. सुरू असलेले काम लाखांचे की कोटींचे, हे तपासण्यासाठी नागरिकांना माहिती अधिकाराचे हत्यार उपसावे लागत आहे.
रस्त्यांच्या कामांवर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब सुटली आहे, की याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे अशी शंका त्यामुळे व्यक्त केली जात आहे. रस्ता कामाचा कार्यरंभ आदेश मिळाला की ठेकेदार कामास सुरवात करतो.
कामाच्या ठिकाणी तशी माहिती दर्शविणारा नामफलक लावणे बंधनकारक आहे. कामास मंजूर निधी, अंदाजपत्रक, कामाचे स्वरूप, ठेकेदार आणि कंपनीचे नाव यासारखी माहिती नामफलकात असते. त्यावरून नागरिकांना कामासंबंधी तत्काळ माहिती उपलब्ध होते.
परंतु, निफाडच्या पूर्व भागातील निमगाव वाकडा- भरवस आणि भरवस- वाहेगाव- मरळगोई रस्त्यावर असा कोणताही नामफलक लावलेला दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यांसाठी नेमका किती निधी मंजूर आहे, याबाबत नागरिकांना माहिती नाही.
जाणूनबुजून हे नामफलक लावले जात नसून, बांधकामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप गोंदेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश चिखले यांनी केला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नामफलक दाखवा, हजार रुपये मिळवा
भरवस- वाहेगाव- गोंदेगाव आणि निमगाव वाकडा- मरळगोई- भरवस या रस्त्यावरील कामांच्या ठिकाणी माहिती दर्शविणारा नामफलक दाखवा आणि रोख हजार रुपये मिळवा, अशी योजना श्री. चिखले यांनी सोशल मीडियावर जाहीर केली.
जीपीएस मॅपमधील फोटो देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २४) दिवसभर चिखले यांची पोस्ट चर्चेत होती.
भीक मागण्यास परवानगी द्या
भरवस- वाहेगाव- गोंदेगाव रस्त्याच्या कामावेळी ठेकेदाराचे पैसे संपले असतील, तर या ठिकाणी नामफलक लावण्यासाठी चिखले यांनी तयारी दर्शविली आहे.
यासाठी नागरिकांकडून भीक मागण्याची परवानगी देण्याची विनंती त्यांनी निफाड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडे केली आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी या मागणीस कसे उत्तर देतात, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.