Nashik News : कोंबडवाडी येथील रणरागिनींचा दारुबंदी विरुध्द एल्गार.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation News

Nashik News : कोंबडवाडी येथील रणरागिनींचा दारुबंदी विरुध्द एल्गार....

वणी : दिंडोरी तालुक्यातील मोठ्या गांवासह खेड्यापाड्यात खुलेआम व लपून छपून चालू असलेल्या अवैधरीत्या मद्यविक्री होत असल्याने नागरिकां सोबतच लहान मुलेही दारुच्या आहारी जात आहे. तरुणपिढी व्यसनाधिन होत असल्याने मुलांवर अयोग्य संस्कार होत आहेत. दारुड्यांमुळे गावात नेहमी छोटेमोठे वाद उद्भवतात.

या भांडणाचा विशेष करुन महिलांना जास्तीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तालुक्यातील खेड्या पाड्यातील रणरागिणींनी अवैध धंद्याविरुध्द आक्रमक होत असून तालुक्यातील कोंबडवाडी येथील रणरागिनींनी एल्गार करीत गांवात दारुबंदीचा ठराव केला आहे. (Women in Kombadwadi against liquor ban for agitation Nashik News)

नाशिक जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामिण भागात फोफावलेले अवैध धंदे व याबाबत सामान्य नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेवून ग्रामिण पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांनी पदभार स्विकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. असे असले तरी खेड्यापाड्यात अजूनही लपून छपून मद्य विक्री व अवैध धंदे सुरु आहेत.

अशा गावातील महिलावर्ग आता आक्रमक होवून रस्त्यावर येवू लागल्याने अवैधधंदे चालकांचे ढाबे दणादणाले आहे. दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, जानोरी, जालखेड, गोळशी फाटा येथील महिलांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्यानंतर आता वरखेडा येथील कोंबडवाडी परिसरातील महिलांनी बेकायदा दारू विक्रीबाबत मोहीम उघडली आहे.

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

कोंबडवाडी व वरखेडा येथे दारुबंदी व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा घेवून दारुबंदीचा ठरावही करण्यात आला आहे. याबाबतचे जन जागृती करणारे फलक गावाच्या मुख्य दर्शनी भागात लावण्यात आले आहे. असे असले तरी लपून छपून सुरु असलेल्या अवैधरित्या दारुविक्री बरोबरच जुगाराचा अड्डाही चालविल्या जात असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे.

दररोजच्या या दारुड्यांमुळे इतर नागरिक त्रस्त झाल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून गावातील अवैध दारुविक्री बंद करावी, अशी मागणी महिलांनी केली असून याबाबत वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी यावेळी महिला व ग्रामस्थांना विश्वास देत अवैध धंदे करणाऱ्यांची नावे देण्याऱ्यांचे नावे गुप्त ठेवले जात असल्याने ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

"वरखेडा ग्रामपंचायतीने वरखेडा व कोंबडवाडी परीसरातील दारूबंदीचा ठराव केला आहे. दारूचे दुष्परिणाम व प्रतिबंधासाठी फलक लावले आहेत. पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक कारवाई करावी."

- जयश्री कडाळे, माजी सरपंच

"कोंबडवाडी - वरखेडा शिवारात अवैध दारुविक्री होत असल्याने गावातील महिला दारुबंदी विरुध्द एकत्र आल्या आहेत. याबाबत महिला व ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत पांरपारीक ग्रामसभेचे आयोजन करुन एकमताने दारुबंदीचा ठराव करण्यात आला आहे. महिला व ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करुन पोलिस प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षीत आहे."

केशव वाघले, लोकनियुक्त सरपंच वरखेडा

"वणी पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात ३४ कारवाया केलेल्या आहेत. समुपदेशन केल्याने काही अवैध दारूविक्रेते यांनी हा व्यवसाय सोडून मजुरीचा मार्ग अवलंबविला आहे. चोरूनलपून कोणी व्यक्ती अवैध दारू विक्री करत असेल तर माहिती द्यावी, तत्काळ कारवाई केली जाईल."

स्वप्नील राजपूत, सहाय्यक पोलिस निरीक्षक वणी पोलीस ठाणे