Womens Day 2023 : एकत्र कुटुंब, संस्कारक्षम कुटुंब घडविणाऱ्या लढाऊ जिजाबाई! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jijabai borade

Womens Day 2023 : एकत्र कुटुंब, संस्कारक्षम कुटुंब घडविणाऱ्या लढाऊ जिजाबाई!

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर माणूस असाध्य ते साध्य करू शकतो, ही शिकवण वडिलांनी जिजाबाईंना (jijabai) दिली होती. (womens day 2023 Jijabai borade who kept family culture together nashik news)

सासरी आर्थिक परिस्थिती जेमतेमच, केवळ शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. त्यामुळे पतीच्या खांद्याला खांदा लावून जिद्द व परिश्रमाची जोड देत जिजाबाईंची लढाई सुरू झाली. अपार कष्ट, जिद्द अन् मेहनतीच्या जोरावर त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले.

उच्चशिक्षित केले. हे करत असताना संस्काराची वीणही अशी घट्ट केली, की आजही तिन्ही मुलांचे कुटुंब एकत्रित आहे. महिलांनी मुलांना उच्च संस्कारही देणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्या सांगतात. बेलगाव कुऱ्हे येथील आदर्श महिला जिजाबाई बोराडे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे.

वडिलोपार्जित केवळ तीन एकर शेती होती. तीही कोरडवाहू; परंतु शेतातील बांधावर पेरूची झाडे होती. दुपारच्या भुसावळ-मुंबई पॅसेंजरमध्ये पतीसोबत पेरू विकायचे अन् नाहीच विकले गेले तर इगतपुरीच्या मार्केटमध्ये विकून संसाराचा गाडा चालायचा.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

अशारीतीने तिन्ही मुलांचे शिक्षण केले. मुलगा संजय बारावीनंतर वडिलांना हातभार लागावा म्हणून शेती करू लागला. बाराही महिने उत्पन्न सुरू असावे म्हणून तोंडली कळीची लागवड केली. त्यात बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असे. नंतर पाण्याची कमतरता भासू लागली.

विहीर खोदली. दुसरा विजय आणि तिसरा पोपट गोंदे दुमाला येथील चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत. मोठ्याने पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिकतेची जोड देत पॉलिहाउस उभे केले. त्यात गुलाबाची फूलशेती उभी केली. विविध प्रकारच्या व्हरायटी अन् नानाविध रंगांचे निर्यातक्षम गुलाबाची फुलांमधून वर्षाकाठी लाखोंची कमाई होत आहे.

परिस्थितीमुळे आपण शिक्षण घेऊ शकलो नाही; परंतु आपल्या मुलांचे भवितव्य घडवायचे असेल तर आपल्याला काबाडकष्ट करावे लागेल, ही जाणीव त्यांना होती. आज उत्पन्नाचे स्रोत वाढले, आर्थिक प्रगती झाली. जुन्या घराच्या जागेवर टुमदार घर बांधले; पण वडिलांनी एकत्रित कुटुंबाचा दिलेला वसा मुले आजही जोपासत आहेत ते आईच्या संस्कारामुळेच.

"सुटीच्या दिवशी शेतात गेले, की फक्त आई-वडिलांचे कष्टच दिसतात. बऱ्याचदा शाळेची फी भरायलाही पैसे नसायचे. उन्हातान्हात रात्र-दिवस आईने वडिलांसोबत कष्ट करून आम्हाला शिकविले, सुसंस्कारित केले. आम्ही आज जे आहे ते फक्त आई-वडिलांमुळेच. एकत्र कुटुंबपद्धती ही आमच्या आईची देण आहे. शेवटपर्यंत आम्ही सर्व एकत्र कुटुंबातच राहू." - विजय बोराडे, मुलगा

केवळ वाढविलेच नाही, संस्कारही दिले

शेतात काबाडकष्ट करीत बागायती पिकांबरोबरच पेरूच्या किरकोळ विक्रीतून पतीबरोबर संसार उभा केला. शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम मुले घडवून पितृछत्र हरपलेल्या कुटुंबाच्या त्या आधारवड झाल्या. मुलांना शिक्षण देण्याची प्रबळ इच्छा होती.

प्रतिकूल परिस्थितीतही काळ्या मातीत घाम गाळून जिजाबाईंनी मुलांना फक्त शिकवलेच नाही, तर एकत्र कुटुंबपद्धतीत सुसंस्कारित केले. त्या आज वयाच्या सत्तरीत आहेत. दोन मुले चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत.

मोठा मुलगा संजय पॉलिहाऊसमधील निर्यातक्षम गुलाबाच्या फुलांची आधुनिक शेती करीत आहे. एकेकाळी मातीचे घर होते, तिथे आता टुमदार पक्के छत आहे. त्याहूनही महत्त्वाचे उच्चविद्याविभूषित असूनही तीनही मुले एकत्र कुटुंबात राहतात, ते केवळ जिजाबाईंच्या संस्कारांच्या शिदोरीमुळेच.