
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचा निधी खर्च ‘जैसे थे’! 10 दिवसांत 90 कोटी खर्चाचे आवाहन
नाशिक : जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेला निधी खर्चासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी १५ मार्च डेडलाइन दिली होती. परंतु १४ मार्चपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.
संप सुरू झाला त्या वेळी जिल्हा परिषदेचा ८२ टक्के निधी खर्च होता. आठवडाभर सुरू असलेल्या संपामुळे एक टक्काही निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे सोमवारी (ता. २०) निधी खर्चाचे प्रमाण ‘जैसे थे’ होते. कर्मचाऱ्यांचा संप मिटला असल्याने आता दहा दिवसांत ९० कोटी खर्चाचे आवाहन जिल्हा परिषदेसमोर आहे. (Zilla Parishad Fund Expenditure 90 crore appeal in 10 days Nashik News)
मार्चअखेर पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत निधी खर्चासाठी लगबग सुरू आहे. निधी वेळेत खर्च होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी १५ मार्चची डेडलाइन विभागप्रमुखांना दिली आहे. असे असले तरी निधी खर्च करण्याचे प्रमाण अगदी संथगतीने सुरू होते.
गत १५ दिवसांत केवळ दोन टक्के निधी खर्च झाला असल्याचे आकडेवारीवरून समोर आले होते. निधी खर्च करण्यासाठी धावपळ सुरू असतानाच १४ मार्चपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संपाचा फटका बसू नये, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी कर्मचारी संपावर असले तरी कामे सुरू असल्याचा दावा केला होता.
१३ मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेत मित्तल यांनी प्राप्त झालेल्या निधीपैकी ८२ टक्के निधी खर्च झाल्याचे सांगितले होते. १८ टक्के निधी खर्च झालेला नव्हता. यातही ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी आणि महिला बालकल्याण विभागातील खर्चाचे प्रमाण हे ७० टक्क्यांच्या आता आहे.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
बांधकाम विभाग एक, दोन विभागाचा निधी खर्च ७५ टक्के झालेला असला तरी बांधकाम विभाग तीनचे निधी खर्चाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत, समाजकल्याण, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंधारण विभागाचा निधी खर्चाचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे.
आठवडाभर सुरू असलेला संप सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आला. या आठवडाभरात निधी खर्चाचे प्रमाण ‘जैसे थे’ आहे. कर्मचारी नसल्याने देयके निघालेली नाही. त्यामुळे एक टक्कही निधी खर्च झालेला नाही.
निधी खर्चासाठी केवळ १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत जिल्हा परिषद प्रशासनाला ९० कोटींहून अधिक निधी खर्च करायचे धनुष्य पेलायचे आहे. मंगळवारी (ता. २१) कर्मचारी रुजू झाल्यापासून निधी खर्चाचा वेग वाढणार आहे.