
Womens Day 2023 : जिल्हा परिषद प्रशासनाची दोरी सावित्रीच्या लेकींच्या हाती!
विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : ‘जागतिक महिला दिन’ (Womens Day) म्हणजे आपल्या मातृशक्तीला पूजण्याचा अन् त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा उत्सव.
आज स्त्रीशक्तीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या सामर्थ्याचा मोठा ठसा उमटवला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी या जागतिक महिला दिनाचे महत्त्व काहीसे वेगळे आहे. (zilla parishad Women officer are in key positions nashik news)
जिल्ह्याच्या मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार नारीशक्तीच्या बळावर ताकदीने पुढे चालला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, उपमुख्यलेखा व वित्त अधिकारी यांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर महिला आहेत. त्यामुळे ग्रामीण विकासाची दोरी सर्वार्थाने महिलांच्या हाती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
गत पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेत अध्यक्षांसह प्रमुख सभापतीपदावर महिलाराज होता. त्यावेळी प्रशासनप्रमुख पदावरही महिला कार्यरत होत्या. त्यानंतर, पदाधिकारी, सदस्यांचा कालावधी संपुष्टात येऊन जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरू झाली. तीस वर्षानंतर सुरू असलेल्या या प्रशासकीय राजवटीतही प्रशासन प्रमुख म्हणून महिला अधिकारी यांना काम करण्याची संधी मिळाली.
तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची बदलीनंतर आयएएस आशिमा मित्तल यांची नियुक्ती झाली. सूत्रे हाती घेतल्यापासून मित्तल यांनी नावीन्यपूर्ण योजना राबविण्यावर भर दिला आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील निवडक ५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘सुपर ५०’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून राबविण्यात येत असलेली ‘सुपर फिफ्टी’ योजनेची आता राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. या शिवाय जिल्हा कुपोषण निर्मूलनासाठी त्यांनी ध्येय निश्चित करत, ५० आशा, पर्यवेक्षिका थेट आयआयटी मुंबई प्रशिक्षण हाती घेतले आहे.
नाशिक जिल्हा टंचाई मुक्त करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मिशन भगीरथी प्रयास राबवीत आहे. ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील नरेगातून राबवीत असलेला पहिलाच उपक्रम आहे. गतिमान प्रशासन करण्यासाठी त्यांनी अंदाजपत्रकात विशेष तरतुदी केल्या आहेत.
दुसऱ्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्ती म्हणजे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे. त्यांनी जिल्ह्यात विविध पदावर काम केले असून त्यांच्या कार्यकाळात जिल्हा हगणदारी मुक्त झाला आहे. नुकतीच संगमनेरे यांना प्रकल्प संचालक पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
केंद्र व राज्यातील योजना ग्रामीण विकास यंत्रणेकडे वर्ग झाल्याने राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, वित्त आयोग, सांसद आदर्श ग्राम योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आदी केंद्रीय योजनांची जबाबदारी संगमनेरे सांभाळत आहे. संगमनेरे यांनी विभागाच्या माध्यमातून महिला बचत गटांना आतापर्यंत १२२.९६ कोटींचे कर्ज पुरवठा करत महिलांना हातभार लावला आहे.
घरकुल योजनेचे ८० टक्के काम करत त्यांनी नाशिक जिल्हा विभागात दुसऱ्यास्थानी पोहचविला आहे. स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी स्वच्छ भारत अतंर्गत सर्वेक्षणात चांगली कामगिरी केली असून, नाशिक जिल्हा राज्यात अव्वल आणला आहे. गावांतील प्रत्येकास शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी गुणवत्तेवर भर देत चांगले काम त्यांनी उभे केले आहे.
घनकचरा व सांडपाणी यातही जिल्ह्याची कामगिरी राज्यात सरस ठरली आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून गोबरधन प्रकल्प अंदरसूल (ता. येवला) येथे पूर्ण झाला असून यातून स्वयंपाकघरातील किचन वेस्ट, शेतातील गावातील कचऱ्याद्वारे गॅस निर्मिती करणारा प्रकल्प उभारला गेला आहे. राज्यात पहिलाच अशा प्रकारचा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात उभारला जात आहे.
जिल्हा कृषी अधिकारी पदावर आतापर्यंत महिला अधिकारी यांनी काम केलेले नाही. मात्र, तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा पदभार जिल्हा कृषी सहाय्यक अधिकारी मयूरी झोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कृषी अधिकारी म्हणून काम करतांना त्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचल्या आहेत. लेखा व वित्त विभागात उपमुख्यलेखा व वित्त अधिकारी म्हणून स्वरांजली पिंगळे कार्यरत आहे. त्या उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू असून, लेखा विभागाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात.
आदिवासी आयुक्तालयाची धुराही महिलेकडे !
राज्याचा आदिवासी आयुक्त कार्यालय नाशिक मध्ये कार्यरत असून, या आयुक्तलयाचा कारभार देखील महिला हाकत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम करत असलेल्या नयना गुंडे यांची आदिवासी आयुक्त म्हणून बदली झाली आहे. नयना गुंडे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून आदिवासी आयुक्तालयात कामाचा धडाका लावला आहे.
आदिवासी बांधवांच्या कलाकसुरीचा वाव मिळावा त्यांना योग्य ती बाजारपेठ मिळावी, या करिता आदिहाट प्रदर्शन त्यांनी सुरू केले. प्रकल्प कार्यालयात त्यासाठी स्वतंत्र जागा त्यांनी दिली. विभागातील वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी विभागामार्फत त्यांनी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. हायटेक आश्रमशाळा करण्याचा त्यांचा संकल्प आहे.