
Water Shortage Review Meeting : अल निनोच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म नियोजन करावे : ZP CEO आशिमा मित्तल
Water Shortage Review Meeting : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई व अल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व गावांमध्ये पाणी टंचाईसंदर्भात कुठलीही समस्या उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गट विकास अधिकारी व उपअभियंता यांना दिले. (ZP CEO Ashima Mittal statement at Water Shortage Review Meeting Micro planning should done in wake of El Nino nashik news)
पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई व अल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे गुरुवारी (ता.११) बैठक घेतली.
ग्रामीण भागात कोणत्याही गावात पाण्याची समस्या भेडसावू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या बैठकीत सांगितले. त्या अंतर्गत टंचाई कालावधीत ज्या उद्वभवावरून (पाणी घेण्याचे ठिकाण) पाण्याची उपलब्धता होणार आहे,
त्याची निश्चिती करून सोर्स मॅपिंग करावे, प्रगतिपथावर असलेल्या नळयोजना पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, नळ योजनांची दुरुस्ती करावी, विंधन विहीर खोलीकरण करावे, ज्या भागात सार्वजनिक विहिरी या आटल्या असतील अशा ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहीत कराव्यात, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अल निनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या टंचाई आराखड्याबाबत देखील चर्चा झाली. या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन तयार करून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संभाव्य टंचाई आढावा बैठकीत आराखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांना या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. बैठकीस कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, शाखा अभियंता विनोद देसले, प्रदीप अहिरे, अमित आडके यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
"ग्रामीण भागात पाणी टंचाई संदर्भात कुठलीही समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी सर्वप्रथम गावातील ग्रामसेवक अथवा तालुकास्तरीय यंत्रणेस कळवावे, अल निनोच्या संकटामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा."-आशिमा मित्तल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक