ZP Employee Transfers : पहिल्या दिवशी जि. प. कर्मचारी बदल्यांची सेन्चुरी! | ZP Employee Transfers On first day Century of staff transfers nahsik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

ZP Employee Transfers : पहिल्या दिवशी जि. प. कर्मचारी बदल्यांची सेन्चुरी!

ZP Employee Transfers : जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदली प्रक्रीयेस मंगळवारपासून (ता. २३) सुरवात झाली असून, पहिल्याच दिवशी १०० हून अधिक बदल्या करत प्रशासनाने सेन्चुरी मारली आहे.

आदिवासीतून बिगर आदिवासी भागात येण्यासाठी कर्मचारी आग्रही असताना दुसरीकडे आदिवासी भागालाही कर्मचारी वर्गाने मोठी पसंती दिली.

दिंडोरी, त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत बहुतांश कर्मचा-यांनी बदल्या करून घेतल्या आहेत. दिवसभरात सामान्य प्रशासन, अर्थ व कृषी विभागात एकूण १०६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यात ७० प्रशासकीय तर, ३४ विनंती बदल्या आहेत. दोन आपसी बदल्या झाल्या आहेत. (ZP Employee Transfers On first day Century of staff transfers nahsik news)

बहुप्रतिक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्यांना गंगापूर रोडवरील मविप्रच्या होरायझन अॅकडमी येथे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत सुरवात झाली.

यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र बागूल यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिल्या टप्यात सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी (३ बदल्या), वरिष्ठ सहाय्यक (२१ बदल्या) तर, कनिष्ठ सहाय्यक (६०) बदल्या झाल्या आहेत. दोन आपसी बदल्या देखील झाल्या आहेत. यात ६१ प्रशासकीय तर, २४ विनंती बदल्यांचा समावेश आहे. अर्थ विभागात एकूण १५ बदल्या झाल्या आहेत.

यात सहाय्यक लेखा अधिकारी ३, कनिष्ठ लेखा अधिकारी ४, वरिष्ठ सहाय्यक लेखा २, कनिष्ठ सहाय्यक ६ यांचा समावेश आहे. ७ प्रशासकीय तर, ८ विनंती बदल्या झाल्या आहेत. कृषी विभागात एकूण चार बदल्या झाल्या असून यात प्रत्येकी दोन प्रशासकीय व विनंती बदल्या आहेत.

बदल्यांना आदिवासी व बिगर आदिवासींचा समतोलचा अडसर येत असल्याने, बदल्यांमध्ये हा समतोल कसा साधला जाईल असा प्रश्न होता. मात्र, बदल्यांमध्ये कर्मचारी वर्गाने रिक्त जागांमुळे आदिवासी भागात देखील काम करण्याची तयारी दाखवत, या भागाला प्राधान्य दिले.

एकूण झालेल्या १०६ पैकी तब्बल ५८ कर्मचाऱ्यांच्या आदिवासी भागात बदल्या झाल्या आहेत. उरर्वित ४८ कर्मचाऱ्यांच्या बिगर आदिवासींमध्ये झाल्या आहेत. बदली प्रक्रीया प्रसंगी सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, निवृत्ती बगड, मंगेश केदारे, सोनाली साठे, भास्कर कुंवर, कानिफ फडोळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काहींची नाराजी

बदली प्रक्रियेत सहाय्यक प्रशासन अधिकारी व विस्तार अधिकारी (सांख्यिकी) यांच्या बदल्या न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, सहाय्यक प्रशासन अधिकारी पदे फुलफिल झालेली असल्याने बदलीस वाव नव्हता.

त्यामुळे बदली करणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २१ पदे आहेत. या बदल्यांबाबत सकारात्मक विचार करून बदल्या केल्या जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

निवडणुकीमुळे नेत्यांची गर्दी

जिल्हा सरकारी व परिषद सहकारी बॅंकेची निवडणूक होऊ घातली असल्याने बदली प्रक्रीयेप्रसंगी अनेक नेते आवर्जून उपस्थित असल्याचे दिसून आले. जिल्हाभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाठी-भेटी घेत लक्ष ठेवा असे सांगत होते.

विविध कर्मचारी संघटनांचे नेते, पदाधिकारी यांनी देखील हजेरी लावत, आपल्या केडरच्या कर्मचाऱ्यांना बदलीसाठी मदत करत असल्याचे यावेळी दिसून आले.

आजची बदली प्रक्रीया स्थगित

बुधवारी (ता.२४) ग्रामपंचायत विभाग आणि महिला बालकल्याण विभागातील बदली प्रक्रीया होणार होती. परंतु, मुंबईत तातडीने मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक असल्याने या बदल्या स्थगित

करण्यात आल्या आहेत. या विभागातील बदल्या आता गुरुवारी (ता.25) होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.