ZP Employees Transfer : बदल्यांचे रडगाणे सुरूच! बदल्या होऊनही अनेक कर्मचाऱ्यांनी सोडला नाही पदभार | ZP Employees Despite transfers many employees did not quit nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP Nashik latest marathi news

Employees Transfer: ZPत बदल्यांचे रडगाणे सुरूच! बदल्या होऊनही अनेक कर्मचाऱ्यांनी सोडला नाही पदभार

Employees Transfer : जिल्हा परिषदेत नियमित बदल्या होऊन दोन आठवडे तर, अंतर्गत बदल्या होऊन २४ तास झालेले असले तरी, बदल्यांचे रडगाणे सुरू आहे. यात सोईची बदली न मिळाल्याने अन्याय झाल्याचे कर्मचारी वर्गाकडून ओरड केली जात आहे.

तर, नियमित बदल्या होऊन त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देऊनही अनेक कर्मचाऱ्यांना पदभार सोडलेले नसून नवीन पदभार स्वीकारलेला नाही. (ZP Employees Despite transfers many employees did not quit nashik news)

मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या नियमित बदली प्रक्रीया पार पडली. समुपदेशपद्धतीने ही बदली प्रक्रीया झालेली असतानाही अनेकांकडून आता अन्याय झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहे.

बदल्या झाल्यानंतर संबंधित विभागांनी अद्यापही काही कर्मचा-यांना कार्यमुक्त केलेले नाही. तर, काही विभागांनी कार्यमुक्त करून संबंधित कर्मचारी बदली स्थानी हजर झालेले नसल्याचे बोलले जात आहे.

या बदल्यांपाठोपाठ अंतर्गत बदल्या करत, अनेकांची विभागांमधून उचलबांगडी करण्यात आलेली आहे. अंतर्गतबदल्यानंतर आता, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी नाटय रंगलेले अनेक विभागांमध्ये दिसून आले आहे.

त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची ओरड करण्यास सुरवात केली आहे. एका विभागातील कर्मचाऱ्यांनी तर बदल्या केल्याने विभागप्रमुखांचे अभिनंदन केले. मात्र २४ तासानंतर अंतर्गत बदल्यांची गरज नसल्याचे सांगत चुकीच्या बदल्या झाल्याच्या तक्रारी या कर्मचारी वर्गाकडून सुरू झाल्याची चर्चा आहे.

अंतर्गत बदल्या झाल्यानंतर अनेक विभागांनी जसे की, सामान्य प्रशासन विभागाने लागलीच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले. मात्र, अनेक विभागांकडून अद्यापही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. अनेकांनी तर यात मी तुला सोडणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बदली होऊन संबंधित कर्मचाऱ्यास हजर होण्यास अडचण येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सात सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांच्या बदल्या

लेखा व वित्त विभागातील ७ सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लेखा विभागातील अजय कस्तुरे यांची बांधकाम दोन, कृषी विभागातील चंद्रकांत सरोदे यांची महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभागात, येवला पंचायत समितीतील कैलास घुमरे यांची कृषी विभागात, दिंडोरी पंचायत समितीतील प्रदीप सोमवंशी यांची लेखा विभागात,

नांदगाव पंचायत समितीमधील श्रीपाद जोशी यांची ग्रामीण विकास यंत्रणा विभागात, मालेगाव पंचायत समितीमधील श्याम कांबळे यांची लेखा विभागात बदली झाली आहे.

हळदे यांच्या बदलीचा शॉक

अंतर्गत बदली प्रक्रीया मंगळवारी पार पडल्यानंतर अनपेक्षितपणे बांधकाम विभागात प्रभारी पदावर असलेले सहाय्यक लेखा अधिकारी विजयकुमार हळदे यांची बदली बांधकाम विभागात पूर्णवेळ करण्यात आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

हळदे यांची बदली नरेगात होती. त्यांच्याकडे बांधकामचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. मात्र, अचानकपणे त्यांची बदली झाल्याने या बदलीची जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गात एकच चर्चा होती. या बदलीसाठी बांधकाम कार्यकारी अभियंता यांनी स्वतः पत्र दिल्याचे बोलले जात आहे.