Mission Bhagirath Prayas : मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad nashik

Mission Bhagirath Prayas : मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली

नाशिक : टंचाईमुक्त करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत जिल्हा परिषदमार्फत ‘मिशन भगीरथ प्रयास योजना’ हाती घेण्यात आली आहे.

ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी अलवार (राजस्थान) दौरा केला (Zp take action to prevent migration of labourers by spread awareness about Mission Bhagiratha Prayas will among villagers nashik news)

यानंतर आता जनजागृती आणि प्रबोधनावर जिल्हा परिषदेने भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गावागावांमध्ये जाऊन बैठका घेऊन प्रबोधन केले जाणार आहे. यात मजुरांना गावातच काम देऊन त्यांचे होणारे स्थलांतरणदेखील रोखले जाणार आहे.

जिल्हा परिषदमार्फत ‘मिशन भगीरथ प्रयास योजना’करिता एकदिवसीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थान राज्यात केलेल्या जलसंधारण कामांची यशोगाथा कथन केली.

त्यासाठी केलेल्या उपाययोजनांची व नियोजनाची माहिती दिली. त्याअनुषंगाने लघुपाटबंधारे विभागांतर्गत २६ अधिकारी व कर्मचारी यांनी अलवर येथे झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी दौरा नुकताच केला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार यांच्यासह २६ अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

या पथकाने काही गावांमध्ये कामांची पाहणी केली. डॉ. राजेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली. गावागावांतील प्रबोधन, लोकांचा सहभाग या जोरावर ही योजना यशस्वी केल्याचे या वेळी सांगण्यात आले. आता याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातही जनजागृती व प्रबोधन जिल्हा परिषदेमार्फत केले जाणार आहे.

प्रत्यक्ष लोकांचा सहभाग घेतल्याशिवाय गावात बंधारे, दुरुस्ती होणे अशक्य आहे. ही कामे करण्यासाठी मार्च ते जून या चार महिन्यांचा कालावधी आहे. मात्र या कालावधीत टंचाई असल्याकारणाने प्रामुख्याने सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण या तालुक्यांमधून मजुरांचे स्थलांतरण होते.

हे स्थलांतरण होऊ नये, यासाठी गावामध्येच त्यांना नरेगांतर्गत काम उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी गावागावांत जाऊन बैठका घेण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी सांगितले. मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत सद्यःस्थितीत पेठ व सुरगाणा येथे मोठ्या प्रमाणावर कामांना सुरवात झाली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना

विभागप्रमुख-गटविकास अधिकारी यांच्या झालेल्या समन्वय बैठकीतही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रामुख्याने मजुरांचे स्थलांतरण होणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करा, अशा सूचना केल्या आहेत. गावांमध्ये नरेगांतर्गत कामे आहे. यात मजुरांना गावातच कामे देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

"अलवार येथील दौऱ्यात तेथील कामांची पाहणी केली. गावागावांत प्रबोधन, लोकांच्या सहभागातून ही कामे उभी राहिली आहेत. याच धर्तीवरच जिल्हा परिषदेतर्फे प्रबोधन व लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावागावांत बैठका घेणार आहे. सुरगाणा तालुक्यापासून या बैठकांना सुरवात केली जाणार आहे." - डॉ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद