स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जातीयवादाला प्रखर विरोध; शरद पोंक्षे

शरद पोंक्षे : काळाराम संस्थान वासंतिक नवरात्रोत्सव
Sharad Ponkshe
Sharad PonksheFacebook

पंचवटी : जगात हिंदू धर्म हा एकमेव धर्म असून, बाकी केवळ धर्मसंस्था आहेत. एका माणसाने दुसऱ्याशी प्रेमाने, सलोख्याने वागणे म्हणजे हिंदू धर्म. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आयुष्यभर हिंदू धर्मातील जातीयवादाला विरोध केला, एवढेच नव्हे तर त्यांनी जातिव्यवस्था संपविण्याचा प्रयत्नही केला. परंतु दुर्दैवाने हिंदू राष्ट्रासाठी आयुष्य वेचलेल्या या नेत्याच्या हिंदूत्ववादाला समजून घेण्यापेक्षा त्यांची निंदाच अधिक झाली, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

श्री काळाराम संस्थानतर्फे गुढीपाडव्यापासून सुरू असलेल्या वासंतिक नवरात्रोत्सवात गुरुवारी (ता. ७) श्री. पोक्षे यांनी ‘सावरकर विचारदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन करताना सावरकरांचे हिंदुत्व, हिंदूराष्ट्र निर्मितीसाठीचा प्रयत्न, जातिव्यवस्थेचा असलेला विरोधावर भाष्य करताना उपस्थितांची भरभरून दादही मिळविली. श्री. पोंक्षे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी गर्दी उसळली होती. देशातील हिंदूंना दुखवायचे असेल तर हिंदू राष्ट्रासाठी आयुष्य वेचलेल्या स्वातंत्र्यवीरांविषयी बोललो की, आपोआपच सर्व दुखावले जातात. मात्र,कडवट हिंदुत्व असलेले सावरकर एकमेव नेते होते, बाकीच्यांचे हिंदुत्व लवचिक असल्याचे श्री. पोंक्षे यांनी सांगितले. आपल्याकडे छत्रपती शिवराय, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण यांच्या शौर्याचा इतिहास कधीच शिकविला गेला नाही, तर १९२० ते ४७ या काळातच इतिहास शिकविला गेल्याचे त्यांनी सांगितले. जगात एकमेव धर्म म्हणजे हिंदू असून बाकी धर्मसंस्था आहेत. मात्र, जाती व्यवस्थेमुळे हिंदू धर्माचे मोठे नुकसान झाले. हे हेरून सावरकरांनी या धर्मातील जातिव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा शनिवारी समारोप होत आहे. राज सिन्नरकर ‘योग आणि श्रीराम जीवन’ याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

रविवारी श्रीराम जन्मोत्सव

रविवारी (ता. १०) दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव होणार आहे. सायंकाळी सातला मंदिराच्या आवारात अन्नकोट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. १२) दुपारी साडेचारला श्रीराम व गरुड रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून रथोत्सवाला प्रारंभ होईल. बुधवारी (ता. १३) सायंकाळी सातला गोपालकाला व उत्सव समाप्ती मंत्रजागराने महोत्सवाची सांगता होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com