PHOTOS : बहुचर्चित 'पानिपत' चित्रपटासाठी नाशिकच्या मुग्धाचा सिंहाचा वाटा !

राजेंद्र बच्छाव : सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 6 November 2019

बहुचर्चित 'पानिपत' चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. अवघ्या दोन दिवसात २ करोड़ लोकांनी ते बघितले आहे. तत्कालीन युद्धभूमी, प्रचंड वाडे, किल्ले आदी पार्श्वभूमी या चित्रपटासाठी अगदी जशीच्या तशी उभारण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना जाते, मात्र या भव्यते मध्ये नाशिककर मुग्धा कुलकर्णी हिचा देखील सिंहाचा वाटा आहे. या चित्रपटात तिला सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

नाशिक : येत्या सहा डिसेंबरला मराठ्यांचा जाज्वल्य अशा १७५७ च्या 'पानिपत' च्या लढाईची कथा सांगणाऱ्या आणि संपूर्ण भारतात प्रदर्शित होणाऱ्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित 'पानिपत' चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. अवघ्या दोन दिवसात २ करोड़ लोकांनी ते बघितले आहे. तत्कालीन युद्धभूमी, प्रचंड वाडे, किल्ले आदी पार्श्वभूमी या चित्रपटासाठी अगदी जशीच्या तशी उभारण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना जाते, मात्र या भव्यते मध्ये नाशिककर मुग्धा कुलकर्णी हिचा देखील सिंहाचा वाटा आहे. या चित्रपटात तिला सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून या संधीचे तिने सोने करून दाखविले आहे. 

Image may contain: 1 person, outdoor and closeup

आवडीचे असे कलादिग्दर्शन मधील 'सेट डिझाईनिंग' क्षेत्र निवडले
पानिपत चित्रपटासाठी जयपूर येथे शेवटच्या घनघोर युद्धासाठी उभारण्यात आलेल्या सेटची मुख्य जबाबदारी तिच्याकडे देण्यात आली होती. मुंबई नाकाजवळ असलेल्या दिपालीनगर येथील हरी भक्तीधाम सोसायटी येथे ती वडील सुधीर कुलकर्णी, आई विद्या आणि फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेणाऱ्या क्षितिजा या बहिणीसह राहते. सीबीएस जवळील सारडा कन्या विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने आरवायके विज्ञान महाविद्यालयातून अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मविप्र संस्थेच्या आर्किटेक्चर महाविद्यालयात तिने शिक्षणास सुरुवात केली. त्यात कलादिग्दर्शन या प्रकारातील सेट डिझाईनिंग हे क्षेत्र तिने निवडले. हे शिक्षण घेत असताना नितीन देसाई यांच्या एन.डी.वर्ल्ड स्टुडिओमध्ये तिला इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली, त्या काळात तिने चित्रमहर्षी बाबुराव पेंढारकर यांच्यावर सादर केलेल्या प्रकल्पासाठी स्वतः देसाई तिचे मार्गदर्शक होते. ते काम बघूनच तिला त्यांच्या मार्फत महेश कोठारे दिग्दर्शित गाजलेल्या 'अहिल्याबाई होळकर' या टीव्ही मालिकेवर काम करण्याची संधी मिळाली. त्यातील बहुचर्चित 'भोर' वाड्या चा सेट उभारण्यात तिचा मोलाचा वाटा होता. दरम्यान शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देसाई यांनी तिला जेव्हा वाटेल तेंव्हा माझ्याकडे ये आणि काम सुरु कर असे सांगितले होते .त्यामुळे अर्थातच तिने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे थेट सहायक कला दिग्दर्शिका म्हणून काम सुरू केले. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

Photo : "पानिपत" चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत मुग्धा कुलकर्णी 

 जयपूर येथे अतिभव्य सेटची जबाबदारी मुग्धाने स्वीकारली
तिने 'फर्जंद' आणि कंगना राणावत यांचा 'मनकर्णिका' या ऐतिहासिक चित्रपटांसाठी देखील काम केले. तेथील काम बघूनच आशुतोष गोवारीकर यांच्या सहमतीने तिला 'पानिपत' या महत्वाकांक्षी चित्रपटासाठी संधी मिळाली. चित्रपट संपूर्ण ऐतिहासिक आणि भव्यदिव्य असल्याने दिवसरात्र शेकडो लोकांची टीम विविध प्रकारचे सेट उभारण्यात व्यस्त होती. या चित्रपटात तिने केलेल्या कामावर खुद्द गोवारीकर आणि निर्माती सुनीता गोवारीकर यांनी देखील तिचे वेळोवेळी कौतुक केले. चित्रपटाचे नायक अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सेनन आदींनी देखील या भव्य सेट्सच्या निर्मितीबद्दल तिच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे चित्रपटातील परमोच्च बिंदू असलेल्या अंतिम लढाईसाठी जयपूर येथे अतिभव्य असा युद्धाचा सेट उभारण्यात आला होता .या संपूर्ण सेट ची जबाबदारी मुग्धाने पार पडली आहे. कित्येक दिवस शेकडो हात दिवसरात्र त्यासाठी काम करत होते. चित्रपटाची संपूर्ण कास्ट बहुतांश महाराष्ट्रीयन असली तरीदेखील चित्रपटाचा विषय आणि आवाका भव्य असल्याने बारीकसारीक गोष्टींचा अनुभव आल्याचे ती नमूद करते. यामुळे या निर्मितीमध्ये आपण सहभागी आहोत याचा अभिमान असल्याचे ती सांगते . 

Image may contain: 3 people

Photo : कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि सुनीता गोवारीकर यांच्यासह मुग्धा कुलकर्णी 

स्वतःवरचा विश्वास महत्त्वाचा - मुग्धा कुलकर्णी
जयपूर येथील हे सलग तीन महिन्यांचे चित्रीकरण संपल्यानंतर शेवटच्या दिवशी गोवारीकर यांनी मुग्धाला बोलावले आणि म्हणाले की, तुमच्या संपूर्ण युनिटमध्ये तू एकटी मुलगी होती . तुला काही त्रास झाला असेल तर तू स्पष्टपणे सांगू शकतेस . तू उत्तम रीतीने काम करत असून तुला उज्वल भविष्य आहे .याच पद्धतीने आणि निष्ठेने काम कर. या शुभेच्छा मी माझ्या कामाची पावती मानते असे मुग्धा सांगते.आजकाल मोठ्या संख्येने मुली या क्षेत्रात येत आहेत ,आपल्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छाशक्ती असेल आणि त्या ध्येयाने प्रेरणा घेत प्रामाणिकपणे कष्टाची जोड देऊन प्रयत्न केले तर यश नक्की मिळते. स्वतःवरचा विश्वास महत्त्वाचा असतो .सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे हे खरे असले तरी गुणवत्ता ही देखील महत्त्वाची असते. चित्रपट क्षेत्रातील कामाबाबत आज देखील आपल्या भागात विशेष अशी जागृती नाही.आजही आपण पारंपरिक व्यवसायिक आणि इतर क्षेत्रातच करिअरच्या संधी शोधत असतो. मात्र चित्रपट क्षेत्रात आज मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कदाचित या क्षेत्राबाबत असणारे अनेक गैरसमज त्यासाठी कारणीभूत असावेत .मात्र स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून या क्षेत्रात आले तर आपल्यासाठी प्रचंड काम करण्याची संधी येथे उपलब्ध आहे हे लक्षात घेतले पाहिजे असे ती मानते. दरम्यान ऐतिहासिक चित्रपटातील अनुभव सोबत इतरही काम करण्याचा अनुभव मिळावा यासाठी तिने कला दिग्दर्शक सुनील निगवेकर यांच्या सोबत काम केले

Image may contain: 1 person, smiling

"पानिपत" नंतर अनेक चित्रपट मुग्धाच्या पदरात

.त्या अंतर्गतच येत्या २४ जानेवारीला सुभाष घई यांची निर्मिती असलेला 'विजेता' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुबोध भावे आणि पूजा सावंत यांची त्यात मुख्य भूमिका आहे, कलादिग्दर्शन सोबत तिने 'असा मी काय गुन्हा केला' हा चित्रपट आणि विविध जाहिरातींसाठी जिंगल्स गायली आहेत. सध्या ती पद्मजा फेनानी यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik's Mugdha Kulkarni,s important contribution to the well-known 'Panipat' movie