
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि नितीन देसाई यांचे कलादिग्दर्शन असलेला पानिपत चित्रपट ६ डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होत आहे. पेशवाई व पानिपतची लढाई, अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातील वेशभूषेसाठी लागलेल्या जवळपास 90 टक्के साड्या, पैठण्या नाशिकच्या सोनी पैठणीने पुरविल्या असल्याचे सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी सांगितले.
नाशिक : बहुचर्चित पानिपत चित्रपटाच्या रूपेरी पदरावर नाशिकच्या पैठणीचा मोर नाचला आहे. या चित्रपटातील नायिका क्रीती सेनन हिच्यासह सर्व महिलांनी परिधान केलेल्या पैठण्या नाशिकच्या सोनी पैठणीने पुरविल्या आहेत. येवला, पेशवाई आणि पैठणी असा सुंदर मिलाफ सोनी पैठणीने "पानिपत'च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळवून आणला आहे.
नाशिक येवल्याच्या पैठणीचा डंका
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि नितीन देसाई यांचे कलादिग्दर्शन असलेला पानिपत चित्रपट ६ डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होत आहे. पेशवाई व पानिपतची लढाई, अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातील वेशभूषेसाठी लागलेल्या जवळपास 90 टक्के साड्या, पैठण्या नाशिकच्या सोनी पैठणीने पुरविल्या असल्याचे सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी सांगितले.
चित्रपटासाठी पैठणींचे सिलेक्शन करताना कलादिग्दर्शक नितीन देसाई
पैठणीचे वैभव पाहण्याची संधी रसिकांना मिळणार
सोनी म्हणाले, की चित्रपटाच्या शूटिंगआधी नितीन देसाई यांनी माझ्याशी संपर्क साधला. चित्रपटाच्या कथानकाविषयी सांगितले. या ऐतिहासिक चित्रपटात नऊवार साड्या, पैठण्या यांची गरज लागणार असल्याचे ते म्हणाले. त्या साड्या त्यांनी डिझाईनर स्वरूपात बांधणी करून वापरल्या. मुख्य नायिकेने वापरलेली पैठणी सोनी पैठणीची आहे. नितीन देसाई यांनी आमच्या पैठणीला सुंदर कलात्मकता दिली आहे. सोनी पैठणीने पुरविलेल्या साड्या, पैठण्या, पितांबर, पडदे यांसह महाल, शनिवारवाडा, राजा-राणीचा शयनमहाल, शामियाना दरबार आदी ठिकाणी असलेल्या पलंगावरील व बैठकांवरील कपडे, गालिचे यांसाठी लागणाऱ्या सर्व कलाकृतीचा यात समावेश आहे.
विशेष म्हणजे, श्री. देसाई कर्जत येथील आपल्या स्टुडिओमध्ये साकारलेला शनिवारवाडा, महाल आणि इतर वास्तू रसिकांना पाहण्यासाठी ठेवणार आहेत. त्यामुळे पैठणीचे वैभव पाहण्याची संधी रसिकांना मिळणार असल्याचे श्री. सोनी यांनी सांगितले.
चित्रपटाच्या निमित्ताने पैठणी व पेशवाई संबंधांना पुन्हा उजाळा
येवल्याला पूर्वी येवलवाडी असे नाव होते. पेशव्यांच्या महिलांना येवल्याहून पैठण्या, तर पुरुषांना पितांबर पुरविले जात असत. कालांतराने पेशवाई नष्ट झाली. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने येवला पैठणी व पेशवाई यांच्या संबंधांना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या निमित्ताने सोनी पैठणी प्रथमच हिंदीतील एका ऐतिहासिक चित्रपटाचा एक भाग बनली आहे. - संजय सोनी, संचालक, सोनी पैठणी