नाशिक : नामपूर परिसरात गारपीट; शेतीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

गारपीटीची सर्वाधिक झळ कांदा पिकाला बसली आहे. दुपारपर्यंत परिसरात कडक ऊन असल्याने पावसाचा कुणालाही अंदाज नव्हता. कडाक्याच्या उन्हाने असह्य उकाडा होता. दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन काळ्या ढगांनी गर्दी केल्याने दोनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

नामपूर - शहर व परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू आदिसह रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. 

गारपीटीची सर्वाधिक झळ कांदा पिकाला बसली आहे. दुपारपर्यंत परिसरात कडक ऊन असल्याने पावसाचा कुणालाही अंदाज नव्हता. कडाक्याच्या उन्हाने असह्य उकाडा होता. दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन काळ्या ढगांनी गर्दी केल्याने दोनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसरात गारांचा पाऊस झाल्याने शेती व्यवसायचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

सध्या मोसम खोऱ्यात कांदा काढणीचा हंगाम सुरु असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐनवेळी आलेल्या पावसाने शेतात साठवून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु होती. पावसामुळे उकाडयापासून नागरिकांची सुटका झाली असून परिसरात सुखद गारवा पसरला आहे. नामपुर, द्याने, अम्बासन, खामलोण, निताने, करंजाड, टेंभे, चिराई, आदी गावांना गारपीटीचा फटका बसला. 

पावसामुळे काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दुष्काळी परिस्थितिमुळे यंदा शेती व्यवसायवर दुष्काळाचे सावट आहे. परंतु अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे दुष्काळात तेरावा महीना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. दरम्यान अवकाळी व गारपीट यामुळे  नुकसान झालेल्या भागांची कृषि व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुण अहवाल सादर करावा, असे आदेश बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन्द्र पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: Nasik: Hailstorm in Nampur area

फोटो गॅलरी