धुळीमुळे अपघातात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

जळगाव ः राष्ट्रीय महामार्गावर तरसोद ते चिखली दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यातील नशिराबाद पुढील गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयासमोरील डांबरीकरण केलेला रस्ता पूर्णतः उखडला असून, चोवीस तास धुळीचे लोट रस्त्यावरून उडतात. परिणामी, अपघाताच्या घटना घडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनधारकांसह नागरिक करीत आहेत. 

गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयासमोरील रस्ता गेल्या काही महिन्यांपूर्वी नव्याने बांधण्यात आला होता. हा रस्ता पूर्णतः उखडून गेला. तो नित्कृष्ट कामांमुळे उखडला गेल्याचा आरोप होत आहे. यामुळेच या रस्त्यावरून चोवीस तास धुळीचे थर हवेत उडून वाहनधारकांना वाहने चालविणेही कठीण होत आहे. 

श्‍वसनाचे विकार 
या मार्गावरून जाताना धुळीचे थर हवेत उडून वाहनधारकांसह रुग्णालयात जाणाऱ्या रुग्ण, नातेवाइकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेकांना सततच्या धुळीमुळे श्‍वसनाचे विकार जडले आहेत. 

बांधकाम विभाग ढिम्मच 
जिल्ह्यात साडेचार हजार किलोमीटरचे रस्ते खड्डेयुक्त आहेत. या रस्त्यावरून जाताना निष्पाप नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागत आहे. तरीही खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही कृती कार्यक्रम हाती घेतलेला नाही. यावरून अधिकारी किती निर्ढावलेले आहेत, याचा प्रत्यय जिल्हावासीयांना आहे. शनिवारी एरंडोलजवळ महामार्गावर खड्डे चुकविताना शिरसोलीचे दाम्पत्य ठार झाले. तरीही अधिकारी मूग गिळून बसले आहेत. लोकप्रतिनिधीही बोलायला तयार नाहीत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: national highway 4 way work dust accident