अडीच वर्षांनंतर बक्षिसांची रक्कम अदा

प्रशांत कोतकर
सोमवार, 9 जुलै 2018

राज्यातील 127 खेळाडूंच्या खात्यांत 9 कोटींपेक्षा अधिक वर्ग

राज्यातील 127 खेळाडूंच्या खात्यांत 9 कोटींपेक्षा अधिक वर्ग
नाशिक - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविणाऱ्या 127 विजेत्यांना दोन वर्षांपासून शासनाने जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची बाब "सकाळ'ने उघडकीस आणली होती. यानंतर क्रीडा विभागाने वृत्त व सोशल मीडियावरून "सकाळ'चा पाठपुरावा असल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पुन्हा लाल फितीत अडकलेली फाइल बाहेर काढत संबंधित खेळाडूंची रक्कम व स्पर्धेसह माहिती मागविली. नवीन घोषणेनुसार बक्षिसाची रक्कम न देता जुन्या शासन निर्णयानुसार तीही अडीच वर्षांनंतर रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.

जानेवारी 2015 मध्ये तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाली होती. यात 127 स्पर्धकांनी सुवर्णसह विविध पदके मिळवत राज्याला नावलौकिक मिळवून दिला होता. या वेळी राज्यातील युती सरकारने विजेत्या स्पर्धकांच्या बक्षिसाच्या रकमेत भरघोस वाढीची घोषणा केली. यात सुवर्णपदकासाठी पाचऐवजी दहा लाख, रौप्य- तीनऐवजी सात, तर कांस्यपदक विजेत्यास दीड लाखाऐवजी पाच लाख देण्यात येतील, असे जाहीर केले होते. स्पर्धा होऊन दोन वर्षे झाली. मात्र, या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम मिळालेली नव्हती. ही रक्कम मिळावी, यासाठी विजेत्या खेळाडूंनी शासनासह क्रीडा विभागाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली नसल्याचे उत्तर मिळत होते.

दरम्यान, यासंदर्भात "सकाळ'ने 19 सप्टेंबर 2017 ला वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ही बाब वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले होते. "सकाळ'ने पाठपुरावा सुरू केल्यानंतर अधिकाऱ्यांनी लक्ष घालत क्रीडा व अर्थमंत्र्यांच्या लक्षात ही बाबी आणून दिली. विलंब लक्षात घेत शासनाने जुन्या शासन निर्णयानुसार रक्कम अदा केली.

Web Title: Nationsl Sports Competition Winner Gift Amount