जळगाव, रावेरच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा दावा कायम

जळगाव, रावेरच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा दावा कायम

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यात १८ व १९ जानेवारीस येणारी परिवर्तन यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागा, खर्च देखील करावा लागला तरी जनतेपर्यंत भाजप सरकारचा नाकर्तेपणा पोहोचवा, असे आवाहन जिल्ह्याचे प्रभारी-आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे केले. लोकसभेसाठी रावेर व जळगाव या दोन्हीही जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात १८ व १९ जानेवारीस राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी कार्यालयात आज बैठक झाली. त्यात आमदार डॉ. पाटील बोलत होते. विधानसभेचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंतराव मोरे, माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे विकास पवार, अनिल भाईदास पाटील, प्रमोद पाटील, कल्पना पाटील, तिलोत्तमा पाटील, मंगला पाटील, विलास पाटील, योगेश देसले, विजया पाटील आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, की राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर माजी आमदारांचे नाव घेताना थोडे वाईट वाटते. परंतु आता माजी न राहता आजी पदाधिकारी होण्यासाठी मेहनत घ्या. लोकसभा, निवडणूक जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र या.

सतीश पाटलांच्या कोपरखळ्या
जिल्ह्यासह राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत आहे, जिल्ह्यात अधिकारी राज सुरू आहे, शेतमालाला भाव नाही असे अनेक मुद्दे घेऊन भाजप शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध आवाज उठवा. एकट्या सतीश पाटलांनी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध बोलण्याचा मक्ता घेतला आहे का? यासाठी आपणही ‘माजी’चे आजी होण्यासाठी सत्ताधाऱ्यांविरुद्ध बोलायला शिका, अशा शब्दात आमदार डॉ. सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कोपरखळ्या मारल्या.

परिवर्तन होणार : गुजराथी
माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी म्हणाले, की परिवर्तन होऊ लागले आहे. जनता या भाजप सरकारला कंटाळली आहे. कार्यकर्त्यांनी देखील परिवर्तनासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. राज्यात भाजप, शिवसेना सरकारला जनता कंटाळली आहे. विकास हरपला आहे आणि जनतेला दाखविलेले स्वप्न आता स्वप्नच आहे हे समजले आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे.

महाजनांविरोधात साधे पत्रक का निघाले नाही?
आमदार डॉ. पाटील म्हणाले, भाजप-शिवसेनेच्या विरुद्ध आपण बोलण्यास तयार नाहीत. मंत्री गिरीश महाजन बारामतीच्या विरोधात बोलले, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून साधे पत्रक देखील निघाले नाही. कारण आपण बोलत नाही. आजच जामनेर तालुक्‍यात ४० गावांमध्ये टॅंकर सुरू आहे. मग आपण का बोलू नये? जनतेला यांची दशा कळू द्यावी. जोपर्यंत आपण आपल्या कार्यकर्त्यांचे हुरूप वाढवत नाही तोपर्यंत ‘आजी’ होणार नाही. एकमेकांचे पाय खेचण्यात राष्ट्रवादीतील मंडळी पटाईत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com