राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. परंतु जागावाटपाबाबत चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. उद्या (24 जानेवारी) यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी व्यक्त केली.

जळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. परंतु जागावाटपाबाबत चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. उद्या (24 जानेवारी) यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी व्यक्त केली.

जळगाव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कोअर कमिटीची बैठक आज कॉंग्रेस भवनात बैठक आयोजित केली होती. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष-आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर, ऍड. रवींद्र पाटील, संजय गरुड, माजी आमदार अरुण पाटील, तर कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. ललिता पाटील, बाळासाहेब प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. सतीश पाटील म्हणाले, की आमची आघाडी निश्‍चित आहे. मात्र, जागा जिंकायच्याच या हेतूने आम्ही प्रत्येक जागेवर उमेदवार कोण? या बाबींसह चर्चा करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत राष्ट्रवादीच्या 20, तर कॉंग्रेसच्या 10 जागा आहेत. त्यामुळे 30 जागा जवळजवळ निश्‍चित आहेत. उर्वरित 37 जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यातील बहुतांश जागा निश्‍चित झाल्या आहेत. केवळ दोन-तीन मतदारसंघांच्या जागांवरच निर्णय होणे बाकी आहे. उद्या (24 जानेवारी) आम्ही त्यासंदर्भात पुन्हा चर्चा करणार आहोत. आमचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे-पाटील उद्या (24 जानेवारी) दौऱ्यावर येत आहेत. त्यांनाही आम्ही जागावाटपाची माहिती देऊ. त्यानंतर आम्ही या जागांबाबत माहिती जाहीर करू.

ऍड. संदीप पाटील म्हणाले, की जागावाटपाबाबत आमची सकारात्मक चर्चा झाली. बहुतांश जागांबाबत एकमत झाले आहे. आम्ही जागा वाटप निश्‍चित झाल्यानंतर आमच्या प्रदेश स्तरावरील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू. त्यानंतर जागावाटप जाहीर करू. मात्र आज झालेली बैठक अत्यंत सकारात्मक झाली. आमची आघाडी निश्‍चित झाली असून, आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत.

Web Title: ncp, congress aghadi meeting for seat distribution