Vidhan Sabha 2019 : ...म्हणून सरपंचांपासून पंतप्रधान प्रचाराला आणण्याची भाजपवर आली वेळ : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

भाजपचे विधानसभेच्या १५० उमेदवारांपैकी ७० उमेदवार हे आयात केलेले उमेदवार आहेत. खरंच 'पार्टी विथ डीफरन्स' संकल्पना भाजप राबवत आहे.

येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून भाजपाला सरपंचांपासून पंतप्रधानाना प्रचाराला आणण्याची वेळ आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने येथे आल्या असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल का? या प्रश्नावर त्यांनी स्मितहास्य केले आणि असे होऊन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला, तर बारामतीवरून साखर येथील पत्रकारांना पाठवेल, असे त्या म्हणाल्या.

- ... म्हणून शरद पवारांना म्हणतात 'जाणता राजा'

केंद्र आणि राज्यात गेल्या पाच वर्षापासून सत्ता असताना आणि प्रकरणे इतकी जुनी असताना विरोधी पक्षातील नेत्यांना निवडणुकीच्या अगोदरच का नोटीसा दिल्या जातात? असा सवाल उपस्थित करून हे दडपशाही करणारे सरकार आहे. हे राज्यातील आणि देशातील लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही.

सरकारकडून प्रफुल्ल पटेल यांना निवडणुकीच्या तोंडावर का नोटीस दिली जाते? हा प्रश्न असून कोर्टाची ऑर्डर संबंधीचे पुरावे जर हे सरकार मानणार नसेल, तर सर्वसामान्य जनतेचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित करत कुठलंही सरकार असेल, तर त्यांनी प्रशासनाचा गैरवापर करू नये, असे मत त्यांनी यावेळी लगावला.

- Vidhan Sabha 2019 : मुंबईतील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी शिवस्मारकाविषयी काय म्हणाले?

महाराष्ट्रातून देशाची सुरक्षा होते, याचा आपल्याला अभिमान आहे. देशाच्या सुरक्षिततेत एचएएलचे मोठे योगदान असून महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाण साहेब आणि एचएएल असे ऋणानुबंध आहे. मात्र, अशा एचएएलचे कामगारांच्या रोजगारावर गदा येत असेल, तर हे दुर्दैव आहे.

देशातील आणि राज्यातील सर्वसामान्य जनता या सरकारविषयी नाराज आहे. गेल्या पाच वर्षात ना शिक्षण स्वस्त राहिले, ना आरोग्य चांगले राहिले. भाजप सरकारकडून काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. मात्र, सद्याची परिस्थिती ही काँग्रेसयुक्त भाजप अशी झाली आहे.

भाजपचे विधानसभेच्या १५० उमेदवारांपैकी ७० उमेदवार हे आयात केलेले उमेदवार आहेत. खरंच 'पार्टी विथ डीफरन्स' संकल्पना भाजप राबवत आहे, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, अंबादास बनकर,वसंत पवार,साहेबराव मढवई,  मोहन शेलार, दीपक लोणारी उपस्थित होते.

- Vidhan Sabha 2019 : 'शेंडाही नाही आणि बुडकाही नाही' अशी काँग्रेसची अवस्था : उद्धव ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader and MP Supriya Sule criticized BJP