Vidhan Sabha 2019 : '... तर पहिलवानाला रेवड्या मिळतात'; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

मी महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या कुस्ती संघांचा अध्यक्ष आहे आणि क्रिकेटची जागतिक संघटना असलेल्या आयसीसीचाही अध्यक्ष राहिलो आहे, अशी कोपरखळीही पवारांनी लगावली.

नाशिक : ''कुस्ती कोणासोबत खेळायची हे ठरवावं लागतं. लहान मुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात,'' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. सभेसाठी जमलेली गर्दी बघून निफाडवर महाआघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

पवार पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणाले होते की, आमचा पहिलवान तेल लावून तयार आहे, पण कुणासोबत कुस्ती खेळायची हे ठरवायचं असतं. लहानपणी जत्रेत कुस्ती खेळायचो, तेव्हा पैशांऐवजी रेवड्या मिळायच्या. त्यामुळे लहान मुलांबरोबर कुस्ती खेळावी का हे ठरवावे लागते?” मी महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या कुस्ती संघांचा अध्यक्ष आहे आणि क्रिकेटची जागतिक संघटना असलेल्या आयसीसीचाही अध्यक्ष राहिलो आहे, अशी कोपरखळीही पवारांनी लगावली.

- पारले बिस्किट्सला 410 कोटींचा नफा!

ईडी चौकशीबद्दल पवार म्हणाले...

पवार म्हणाले, मी स्वत: ईडी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. जर मी निवडणूक प्रचारामुळे ईडी चौकशीला गेलो नसतो, तर शरद पवार फरार अशा बातम्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झाल्या असत्या. आणि मला फरार म्हणूनही घोषित केले असते. त्यामुळेच मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मला आलेली नोटीस पाहून अनेक गावांतून लोकं येत होते. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली होती. सत्ता आल्यावर डोकं जागेवर आणि पाय जमिनीवर ठेवायचं असतं, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. 

- निघाला MIM च्या प्रचाराला, केला काँग्रेसमध्ये थेट प्रवेश; हा 'निष्ठावंत' आहे तरी कोण?

राजकीय भूमिकेविषयी केली घोषणा 

यावेळी शरद पवारांनी भविष्यातील राजकीय भूमिकेविषयी मत मांडले. ते म्हणाले, मी स्वत: सत्तेत जाणार नाही. मात्र, लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम करेन.

साखर कारखाने बंद पडत चालल्याने शेतकऱ्यांना दुसरीकडे ऊस द्यावा लागत आहे. तिथंही त्यांना योग्य दर मिळत नाही. दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिलं. मात्र, आहेत त्यांच्या नोकऱ्या जात आहेत, अशी सध्याची स्थिती आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढत चालली आहे, असा आरोपही पवार यांनी यावेळी केला. 

- Vidhan Sabha 2019 : मोदी - फडणवीस हे महाखोटारडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Sharad Pawar criticized CM Devendra Fadnavis