राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे यांना पदोन्नती मिळाली आहे. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम पाहणाऱ्या बलकवडे यांची पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बलकवडे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. 

नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे यांना पदोन्नती मिळाली आहे. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम पाहणाऱ्या बलकवडे यांची पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बलकवडे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. 

महिला आघाडीच्या नेतृत्वात बदल करण्यात येणार असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. पुढील टप्प्यात युवती जिल्हाध्यक्षांसह महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदाची नियुक्ती होईल. संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने खासदार सुळे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या. त्यामुळे महिला आघाडीच्या पुनर्बांधणीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. 

महिला सक्षमीकरणास प्राधान्य 

महिला सक्षमीकरणाच्या कामाला अधिक बळकटी देण्यास प्राधान्य राहील, असे सांगून बलकवडे म्हणाल्या, की महिलांनी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहावे, हाच मुख्य उद्देश सक्षमीकरणाचे उपक्रम राबविताना राहील. आजवर घेतलेल्या बचतगटांच्या कार्यशाळांचा विस्तार करणार आहे. सद्यःस्थितीत मोरांबा, नागली-तांदूळ-बटाटा-साबूदाण्याचे पापड, इगतपुरीचा कणी मसाला आदी उत्पादनांना पुणे-मुंबईची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. भगूरच्या दोनशे भगिनींना रोजगार मिळाला आहे. 

जिल्ह्यात 800 महिलांपर्यंत पोचता आले. या भगिनींना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत असतानाच खासदार सुळे यांच्या नेतृत्वाखाली बचतगटाची चळवळ पुढे नेली जाईल. महाविद्यालयीन युवतींसाठी व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य, परदेशातील शिक्षणाच्या संधी आदींबद्दल उपक्रम राबविले आहेत. त्यातून परदेशात शिकायला विद्यार्थी गेले आहेत. हेही काम पुढे नेण्यात येईल. अशा कामांमधून पक्षाच्या संघटनेशी महिलांना जोडून घेण्यात येईल. 

जिल्ह्याचा दौरा करणार 
पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांनी दुष्काळाच्या अनुषंगाने घेतलेल्या गट-गणनिहाय बैठकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्‍नांची जाण होण्यास मदत झाली आहे. आता पुन्हा टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्याचा दौरा केला जाईल. त्यातून पुढे येणाऱ्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात येईल. वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असेही बलकवडे यांनी सांगितले. 

Web Title: NCP Women's District President's prerana Balakwade