राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बैठक निष्ठेच्या मुद्द्यावरून गाजली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

कुणी पक्ष शहरात वाढविला व पालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेद्वारा विरुद्ध कुणी कसा प्रचार केला. यावरून बैठकीत वादंग झाला.

नांदगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यकारिणीसाठी बोलविण्यात आलेली बैठक निवड होण्यापूर्वीच निष्टेच्या मुद्द्यावरून गाजली. बैठकीत पक्षात निष्ठा कुणाची खरी यावरूनच जुंपली मात्र पक्षाच्या अन्य नेते पदाधिकाऱ्यानी हस्तक्षेप केल्याने निर्माण झालेले विवादाचे मळभ लगेचच दूर झाले व बिनविरोध निवडीचा सोपस्कार पूर्ण झाला संतोष गुप्ता तालुकाध्यक्ष पदासाठी तर नांदगाव शहर अध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष अरुण पाटील व मनमाड शहर अध्यक्षपदी राजाभाऊ पगारे  या तिघांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली.  

बैठक सुरु होण्यापूर्वीच आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत पुन्हा एकदा या तिघांच्या फेरनिवडी झाल्याचे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश आदिक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व निरीक्षक राधाकिसन सोनवणे यांच्या उपस्थितीत आमदार पंकज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात दुपारी झालेल्या या बैठकीत पक्षाच्या क्रियाशील सदस्यांच्या उपस्थितीत तालुका व नांदगाव-मनमाड शहर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु होणार होती. बैठक सुरु होताच नांदगाव शहर अध्यक्ष पदावरून विद्यमान अध्यक्ष अरुण पाटील यांना विचारणा झाल्याने बैठकीत वादळ उभे राहिले. कुणी पक्ष शहरात वाढविला व पालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेद्वारा विरुद्ध कुणी कसा प्रचार केला. यावरून बैठकीत वादंग झाला. हा प्रकार बघून बैठकीला आलेल्या पक्ष श्रेष्टीवर अवाक होण्याची वेळ आली. मात्र पक्षाचे सर्वजण निष्टवान आहेत. शंका घेऊ नका, असे समजुतीच्या मुद्दयांवर येत या वादंगावर पडदा पडला त्यांनतर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्यात विद्यमान तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, नांदगावचे विद्यमान शहर अध्यक्ष अरुण पाटील व मनमाड शहराचे विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ पगारे यांच्या पुन्हा एकदा फेर नियुक्त्या झाल्यात बैठकीला साहेबराव पाटील दिलीप इनामदार,रमेश पगार योगेश पाटील, वाल्मिक टिळेकर, विठ्ठल नलावडे, पापा थॉमस, अमजद पठाण, हबीब शेख, शिरीष पाटील, राजेंद्र लाठे, नारायण पवार, विजय पाटील, अपर्णा देशमुख, योगेश बोरसे अतुल बोरसे, अमित बोरसे, बाळू मोरे, राजेंद्र आहेर, दत्तू पवार, भाऊसाहेब सूर्यवंशी, सूरज पाटील आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: NCP Working Committee meeting