बदललेल्या स्वरूपामुळे "नेट' सुटसुटीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नाशिक - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) आज देशभरात राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) घेण्यात आली. विविध केंद्रांवर झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बदललेल्या स्वरूपामुळे परीक्षा पद्धतीत सुटसुटीतपणा आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली. दरम्यान, परीक्षेतील पेपर क्रमांक 2 या विशेष विषयाशी निगडित पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची कसोटी लागली होती.

विद्यार्थ्यांना सकाळी सातपासून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली होती, तर अंतिम प्रवेश साडेनऊपर्यंत देण्यात आला. परीक्षेतील पहिला पेपर सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत घेण्यात आला. शंभर गुणांच्या या परीक्षेत पन्नास प्रश्‍न विचारण्यात आले. यापैकी गणित, चालू घडामोडी निगडित प्रश्‍नांची काठीण्यपातळी वाढली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

पेपर क्रमांक दोन सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत झाला. दोनशे गुणांसाठीच्या या पेपरमध्ये शंभर प्रश्‍न विचारण्यात आले. अभ्यासक्रमाशी निगडित असलेल्या या प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. प्रश्‍न सोडविताना विचार करावा लागत असल्याने, अनेक विद्यार्थी शेवटच्या मिनिटापर्यंत पेपर सोडविण्यात व्यग्र झाले होते.

या वर्षी असा राहिला बदल
नेट परीक्षेत यापूर्वीपर्यंत तीन पेपर होत होते. मात्र, यंदापासून दोनच पेपर घेण्यात आले. पहिला पेपर शंभर गुणांसाठी, तर दुसरा पेपर दोनशे गुणांसाठीचा होता. पहिल्या पेपरमध्ये सामान्यज्ञान, गणित, अध्ययनाविषयीचे प्रश्‍न, तर दुसऱ्या पेपरमध्ये संबंधित विद्यार्थ्याच्या पदव्युत्तर पदवीच्या विशेष विषयाशी निगडित प्रश्‍न विचारण्यात आले.

Web Title: Neet exam CBSE Education