नेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली. त्यामुळे प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी वादाचा आणखी एक नवा अध्याय पुन्हा सुरू झाला आहे. महापौरांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली. त्यामुळे प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी वादाचा आणखी एक नवा अध्याय पुन्हा सुरू झाला आहे. महापौरांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

स्मार्टसिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे पुनर्निर्माण केल्यानंतर आयुक्तांनी शिक्षकांसाठी एक कार्यक्रम घेऊन उद्‌घाटनाचा सोपस्कार पार पाडल्यानंतर आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा वाद रंगला होता. स्वातंत्र्यदिनी रीतसर उद्‌घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर वाद शमला असतानाच नेहरू उद्यानाच्याबाबतीतही असाच अनुभव नगरसेवकांना आला. काम सुरू असताना जयंतीचे निमित्त साधून स्मार्टसिटी कंपनीमार्फत लोकार्पण सोहळा घेण्याचे नियोजन चार दिवसांपासून सुरू होते. स्मार्टसिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून संचालकांना निमंत्रणे दिली जात असतानाच त्यास विरोध करण्यात आला. उद्यानाचे काम अद्याप सुरू असताना सोहळा का व कुणासाठी करत आहात? असा सवाल करताना काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली होती. सत्ताधारी भाजपनेही काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर वाढता विरोध लक्षात घेऊन कंपनीकडून लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मागे घेण्याची घोषणा केली. परंतु बुधवारी सकाळी जयंतीनिमित्त नेहरूंना अभिवादन केल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी उद्याने खुले करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने नवा वाद निर्माण झाला. महापौर रंजना भानसी यांच्यासह सभागृहनेते दिनकर पाटील, काँग्रेस गटनेते शाहू खैरे व मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी ही निंदनीय घटना असल्याचे सांगत आंदोलनाचा इशारा दिला.

उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला विरोध नव्हता. परंतु प्रांगणातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे काम अर्धवट असताना कार्यक्रम घेणे अवमान ठरला असता. परस्पर घोषणा केल्याने आयुक्तच जबाबदार राहतील.
- रंजना भानसी, महापौर

नगरसेवक, स्मार्टसिटी संचालकांना विश्‍वासात घेऊन लोकार्पण करणे अपेक्षित असताना परस्पर लोकार्पणाची घोषणा आयुक्तांनी केल्याने लोकप्रतिनिधींचा हा अपमान आहे.
- दिनकर पाटील, सभागृहनेते

नेहरू उद्यानात अद्याप कामे अपूर्ण असताना परस्पर लोकार्पणाची घोषणा करणे निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध करतो.
- शाहू खैरे, काँग्रेस गटनेते

नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन लोकार्पण सोहळा घेणे गरजेचे होते. कालिदास कलामंदिराप्रमाणे आयुक्तांनी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींना डिवचले आहे.
- सलीम शेख, मनसे गटनेते

Web Title: Nehru Udyan Inauguration Development