एसटीच्या ताफ्यात नवीन वर्षात 700 बसेस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नाशिक - गेल्या तीन वर्षांत नवीन बसची खरेदी न करता केवळ जुन्या बसचे सांगाडे बदलून पुन्हा वापरात आणण्याच्या एसटीच्या धोरणावर सातत्याने टीका होत असताना आता शासनाच्या वतीनेच एसटीने तब्बल सातशे नवीन बस बांधण्याचा संकल्प सोडला आहे. नवीन वर्षात प्रवाशांना या नव्या कोऱ्या बस सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाढता तोटा कमी करण्याच्या उद्देशाने एसटीने 500 शिवशाही बसची खरेदी वगळता गेल्या तीन वर्षात एकही नवी बस खरेदी केली नाही.

जुन्या बसेसच्या मूळ सांगाड्यावर नवीन बॉडी बांधून त्या बसेस पुन्हा वापरल्या जात आहेत. अर्थात हा महामंडळाचा निर्णय जरी काटकसरीचा योग्य वाटत असला, तरी आयुर्मान संपून गेलेल्या बसमध्ये रस्त्यात बिघाड होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनावर चोहोबाजूने टीकेची झोड उठते. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निधीतून एसटीने तब्बल 700 बसेस खरेदी करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेत तीन प्रकारच्या बस बांधणीसाठी विहित तांत्रिक मुद्द्याच्या आधारे सांगाडे (चेसिस) मागविण्यात आले असून, त्यामध्ये साधी, शयनयान व वातानुकूलित यांचा समावेश आहे.

निविदेला पारंपरिक टाटा, लेलॅंड व आयशर या कंपन्यांसह भारत बेंझ या नवीन कंपनीनेही सांगाडे पुरवण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे. यामध्ये लेलॅंड कंपनीने सर्वात कमी किमतीची निविदा भरली असून तांत्रिकदृष्ट्या सक्षम बस पुरवून खरेदी पश्‍चात बस देखभालीची तयारी नवीन भारत बेंझ कंपनीने दाखविली आहे.

Web Title: New 70 ST Bus