
Dhule News : 5 एप्रिलपासून नवीन पीक कर्जवाटप
धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगामासाठी ५ एप्रिलपासून पीककर्ज (Crop Loan) वितरणाची तयारी सुरू केली आहे. (New crop loan distribution from 5th April Dhule News)
त्यानुसार जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने पीक कर्जदर निश्चित केला आहे. या विषयावर बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेतही चर्चा झाली.
त्यानुसार लवकरच पीककर्ज वितरणाला सुरवात होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली.जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा नुकतीच झाली. त्या वेळी नवीन हंगामासाठी पीक कर्जदर निश्चित करण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने पीक कर्जदराला मान्यता दिली आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यानुसार सोयाबीनला ५० हजार, जिरायत कपाशीसाठी ५५ हजार, बागायत कपाशीसाठी ७५ हजार, मिरचीसाठी ६२ हजार ५००, केळीसाठी एक लाख, केळी टिश्युकल्चरसाठी दीड लाख, पपईसाठी ८७ हजार, पूर्व हंगामी उसासाठी एक लाख १० हजार, रोपलागवडीसाठी सव्वा लाख, खोडव्यासाठी ८५ हजार असा प्रतिहेक्टर पीककर्ज दर निश्चित झाला आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दर सारखेच आहेत. विविध कार्यकारी सोसायटी, आदिवासी विकास संस्थांकडून मर्यादा पत्रक तयार करून त्याला संचालक मंडळाकडून मंजुरी देण्यात येत आहे. तसेच ५ एप्रिलपासून नवीन पीककर्ज वाटप सुरू होईल. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या थकबाकीदारांनी कर्जाचा भरणा ३१ मार्चपर्यंत करावा.
प्रथम कर्ज भरणा केलेल्या सभासदांना प्रथम कर्जवाटप करण्यात येईल, असेही अध्यक्ष कदमबांडे यांनी सांगितले. बँकेच्या प्रशासकीय पातळीवर पीककर्जवाटपासाठी वेगात पूर्वतयारी केली जात असल्याचेही श्री. कदमबांडे, सीईओ धीरज चौधरी यांनी नमूद केले.