केंद्रांवरील तूर खरेदीला नव्या आदेशाची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

जळगाव - केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत आलेली तूर खरेदी करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर त्यासंबंधातील आदेशाची आता पणन यंत्रणेला प्रतीक्षा आहे. यासंबंधी ठराविक सूचनांसह अध्यादेश काढण्यात येणार असून हा आदेश प्राप्त झाल्यानंतर केंद्रांवर आलेली तूर खरेदी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

जळगाव - केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत आलेली तूर खरेदी करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर त्यासंबंधातील आदेशाची आता पणन यंत्रणेला प्रतीक्षा आहे. यासंबंधी ठराविक सूचनांसह अध्यादेश काढण्यात येणार असून हा आदेश प्राप्त झाल्यानंतर केंद्रांवर आलेली तूर खरेदी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

यंदाच्या हंगामात तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर तूरखरेदीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सुरवातीला अखेरच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, ती हवेत विरली व लाखो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे. जळगाव जिल्ह्यात विविध 9 केंद्रांवर तुरीची खरेदी तुलनेने उशिराने सुरू झाली. 22 तारखेपर्यंत या 9 केंद्रांवर 86 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 30-35 हजार क्विंटल तूर अद्याप पडून असल्याचे सांगितले जात आहे. 

तूर खरेदीच्या बिकट समस्येतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिलपर्यंत केंद्रांवर दाखल तुरीची खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, यातही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्रांवर तूर विकल्याचे समोर येत आहे. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातही यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 केंद्रांवर 86 हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. अद्यापही मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर या तीन केंद्रांवर 22 तारखेपर्यंत आलेल्या तुरीपैकी 10 हजार 600 क्विंटल तूर पडून आहे. 

आदेशाची प्रतीक्षा 
दरम्यान, केंद्रांवर 22 तारखेपर्यंत शिल्लक तुरीचे पंचनामे करून, बाजार समितीच्या यादीनुसार या तुरीची खरेदी करण्यात येईल. मात्र, त्यासाठी शासनाच्या या नव्या आदेशाची प्रतीक्षा आहे. पणनच्या कार्यकारी संचालक नीलिमा केरकत्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तूर खरेदीसंदर्भात पत्र पाठवून तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी बारदान उपलब्ध नाही, तेथे ते उपलब्ध करून घ्यावेत व तुरीच्या साठ्याची व्यवस्था करावी असे या पत्रात म्हटले आहे. तूर खरेदीबाबत नव्याने काढण्यात येणाऱ्या आदेशात शेतकऱ्यांचीच तूर योग्य पद्धतीने खरेदी होईल, अशा सूचना असतील. 

मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिलपर्यंत केंद्रांवर प्राप्त तूर खरेदीबाबत भूमिका जाहीर केली आहे. यासंबंधी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आदेश आल्यानंतर तूर केंद्रांवर नोंद झालेल्या तूर खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येईल. 
- सुभाष माळी,जिल्हा मार्केटिंग अधिकारी, पणन महासंघ. 

Web Title: new order to buy tur in the center