स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच: संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला. 

नाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला. 

खासदार राऊत म्हणाले, की भाजप नेते युती होईल असे कितीही सांगत असले, तरी ते शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत. जर आता युतीची भाषा करत असतील तर 2014 मध्ये आम्ही युती करायचे म्हणत होतो, त्या वेळी कुठे तोंडे दाबली गेली? 2019 मध्ये युती का करावी वाटते?, याचेही उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले. नाशिकमधील हिरे कुटुंबाचे राजकारणात चांगले नाव आहे. विविध पक्षांत फिरून आलेले हिरे उद्या कुठे असतील, हे सांगता येत नसल्याची टीका त्यांनी केली. 

राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहण्यासाठी केंद्राचे पथक गावागावांत हिंडत असले, तरी पथकातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी झेड प्लस सुरक्षा पुरवली जात आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्यानेच मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरवली जात आहे. यावरून राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती भयानक आहे, याचे वास्तव लक्षात येत असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला. चारा छावणीऐवजी पाहुण्यांकडे पाठविण्याच्या सल्ला देणाऱ्यांना निवडणुकीत लोकच त्यांना तिकडे पाठवतील, असा टोला त्यांनी मंत्री राम शिंदे यांना लगावला. 

महाजनांवर कारवाई व्हावी 
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांमध्ये दैवीशक्ती दिसत असेल, तर त्यांची आरती ओवाळणे बंद करून चुटकीसरशी दुष्काळ दूर करण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरविण्याविरोधात कायदा करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कायद्याचा अभ्यास करून महाजन यांच्यावर कारवाईचे आवाहन त्यांनी केले. 

मोदींकडून घ्याव्या टिप्स 
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना एका कार्यक्रमात भोवळ आल्याच्या मुद्द्यावर बोलताना, राऊत यांनी गडकरी हे चांगले काम करतात. त्यासाठी ते धावपळ करतात. काम करताना त्यांनी व केंद्रातील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हेल्थ टिप्स घेण्याचा उपरोधिक सल्ला दिला. 

नाशिकमधून निवडणुकीचे रणशिंग 
राममंदिर बांधण्याची केंद्र सरकारला आठवण करून देण्यासाठी अयोध्येत नोव्हेंबरमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमानंतर नाशिकमध्येही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गोदातीरावर शरयू नदीच्या धर्तीवर कार्यक्रम घेण्याचे नियोजन शिवसेनेकडून सुरू आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः हजर राहतील. त्या वेळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होईल. या सभेत पक्षप्रमुख निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला पोषक वातावरण असल्याने राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदापर्यंत जाण्याचा मार्ग येथूनच निश्‍चित होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: next chief minister will be of shivsena says sanjay raut