जैताणेत शिवाजीरोडवरील मोबाईलचे दुकान अज्ञाताने जाळले

प्रा.भगवान जगदाळे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - जैताणे (ता.साक्री) येथील शिवाजी रोडवरील शोएब सत्तार मणियार (वय-24) याच्या मालकीच्या मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने पेटवून दिले. त्यात सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. निजामपूर पोलीस ठाण्यात एका अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) - जैताणे (ता.साक्री) येथील शिवाजी रोडवरील शोएब सत्तार मणियार (वय-24) याच्या मालकीच्या मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला पहाटे दीड वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने पेटवून दिले. त्यात सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. निजामपूर पोलीस ठाण्यात एका अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोएब मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज (ता.27) रात्री दीडच्या सुमारास जैताणेत राहणारे याकूब शेख, मोहसीन शाह, श्री. सिकलीकर आदींनी घरी येऊन श्री. मणियार यांना शिवाजीरोडवरील त्यांच्या टिपू मोबाईल शॉप नावाच्या मोबाईल विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला आग लागली असलेबाबत कळविले. त्यांनतर त्यांनी शेजाऱ्यांसह त्वरित दुकानाजवळ जाऊन खात्री केली असता दुकानाने खरचं पेट घेतलेला होता. शेजारी राहणारे रिझवान सिकलीकर, मुस्तकीम शाह, जब्बार मणियार, मोहसीन मणियार आदींनी मिळून डॉ. रेलन यांच्या बोअरवेलच्या पाण्याने आग विझवली.

त्यांनी दुकानात जाऊन खात्री केली असता दोन संगणक, तीन सिपीयू, एक प्रिंटर, एक झेरॉक्स मशीन, नवे मोबाईल, गिऱ्हाईकाचे दुरुस्तीसाठी ठेवलेले मोबाईलचे 30 नग, हेडफोन, चार्जर, मोबाईल फोनला लागणारे अन्य साहित्य, बिलाच्या पक्क्या पावत्या आदींसह सुमारे दोन लाखांचा ऐवज आगीत जळून खाक झाला असल्याचे आढळून आले. शेजारील रुपम मोबाईल शॉपचे मालक राहुल जयस्वाल यांच्या दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले असता एक अनोळखी इसम दुकानाला आग लावून पळून जाताना दिसला. शोएब मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पाटील घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

संशयिताविरुद्ध कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी, काही काळ रस्ता रोको... लगेच तणाव निवळला...

समाजकंटकांनी विकृत व सूड भावनेने हे कृत्य केले असून त्यांना त्वरित जेरबंद करुन संशयिताविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते युसूफ सय्यद यांच्यासह उपस्थित निजामपूर-जैताणेतील ग्रामस्थांनी केली.

सायंकाळी पाचच्या सुमारास निजामपूर बसस्थानकावर शेकडो ग्रामस्थ जमले होते. त्यांनी काही काळ रस्ताही अडविला. परंतु सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, हवालदार योगेश शिरसाठ, अमीन पिंजारी, मयूर सूर्यवंशी, वसंत गरदरे, श्री. लोहार आदी त्वरित तेथे दाखल झाले. श्री. खेडकर यांनी ग्रामस्थांची समजूत घालत कठोर कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनतर तणाव निवळला.

प्रतिक्रिया...
"घटनेचा सखोल तपास केला जाईल. संशयिताला लवकरच जेरबंद करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यात कोणीही जातीयवाद अथवा राजकारण आणू नये."
- दिलीप खेडकर, सहाय्यक निरीक्षक, पोलीस स्टेशन, निजामपूर-जैताणे.

Web Title: nijampur dhule news mobile shop Burned to the unknown person