निजामपूर-जैताणे बसस्थानकाची दुर्दशा...

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 24 मे 2018

"आगामी काळात गट क्रमांक ९२ वरील न्यायालयीन स्थगिती उठल्यास ग्रामपंचायतीतर्फे आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयासमोर बसस्थानकासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल."
- संजय खैरनार, सरपंच, जैताणे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे १०० खेड्यापाड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील बसस्थानकाची सद्या अतिशय दुर्दशा झाली असून बसस्थानकाचे जुने शेड अक्षरशः पार्किंगचे ठिकाण बनले असून त्याचा उपयोग एखाद्या स्वछतागृहाप्रमाणे होत आहे. निजामपूर ग्रामपंचायत, जैताणे ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पायाभूत सुविधांचा अभाव...
ऊन, वारा, पावसात प्रवासी व विद्यार्थ्यांना अक्षरशः रस्त्यालगतच्या टपऱ्या, दुकाने व पोलीस चौकीच्या आडोशाला डोके लपवून थांबावे लागते. पाण्याची सुविधा नाही. स्वच्छता गृहांची सुविधा नाही. विद्यार्थ्यांसाठी पासेस विभाग नाही. कन्ट्रोल रूम नाही. अद्ययावत शेड नाही. कॅन्टीन नाही. बसेस रस्त्यावरच थांबतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अपघातांची शक्यताही वाढली आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व अतिक्रमणांचा विळखा...
नेत्रांग ते शेवाळी फाटा १०८ किलोमीटरचा ७५३-बी राष्ट्रीय महामार्ग मंजूर असूनही त्याचे नंदुरबार ते शेवाळी फाट्यापर्यंतचे चौपदरीकरणाचे कामही रखडले आहे. बसस्थानक व महामार्गालगत अतिक्रमणांचाही विळखा आहे. आगामी काळात चौपदरीकरणाला सुरुवात झाल्यास अनेक अतिक्रमणे तुटण्याचीही दाट शक्यता आहे. लोकप्रतिनिधींचीही प्रचंड अनास्था असल्याने "सामान्य माणसाने दाद मागावी कुणाकडे.?" असा सवाल उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडून ग्रामस्थांची अपेक्षा...
बसस्थानकाच्या दुरावस्थेला अधिकारी व लोकप्रतिनिधींची उदासीनता व अनास्थाही कारणीभूत असल्याचे ग्रामस्थ उघडपणे बोलू लागले आहेत. राजकीय उदासीनता व प्रशासकीय अनास्थेमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. याबाबत खासदार डॉ. हिना गावित, आमदार डी. एस. अहिरे, जिल्हा परिषद सदस्या इंदूबाई खैरनार, उषाबाई ठाकरे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, सुनीता बच्छाव, जैताणेचे सरपंच संजय खैरनार, निजामपूरच्या सरपंच साधना राणे यांनी गांभीर्याने याकडे लक्ष घालावे. अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nijampur jaitane bus stop issue