सरकारला शेतकरीच सत्तेवरून खेचतील - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

निफाड - ‘‘नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ येतील असे लोकांना आश्‍वासन देऊन केंद्रातील सत्ता मिळवली. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी जी धोरणे अवलंबली. त्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आणि शेतकरी कंगाल झाला. भाजप सरकारमुळे कांदा, दूध, सोयाबीनचे भाव पडले. शेतकऱ्यांचा विश्‍वासघात करणाऱ्या मोदी सरकारला आता शेतकरीच सत्तेवरून खाली खेचतील,’’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता.२७) रात्री कोठुरे (ता. निफाड) येथे केली. 

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोठुरे येथे रात्री ‘हल्लाबोल’ मेळावा झाला. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, की कांद्याला जरा कुठे चांगला भाव मिळू लागला, तर या सरकारने पाकिस्तानमधून कांदा आयात केला. परदेशातून डाळ आयात केली. खाद्यतेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव खाली आले. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे घेतो, असे आश्‍वासन देऊनही फडणवीस सरकारने ते पाळले नाही.

संपूर्ण कर्जमाफी हवीच
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे. त्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे. गाळपेरा जमिनीवर वारसदार व आदिवासी शेतकऱ्यांची नावे पीकपेरा लावली पाहिजेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली थांबली पाहिजे आदी मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या.

माेदींसाठी शेतकरी पाकपेक्षाही माेठा शत्रू
पाकिस्तानात आज टोमॅटो तीनशे रुपयांवर पोचला आहे. अशा परिस्थितीत भारताकडून टोमॅटो आयात करायचे नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र, कांद्याचे भाव घसरले की भाजप सरकार पाकिस्तानातून कांदा मागवून शेतकऱ्यांचे भाव पाडते. यावरून पाकिस्तानपेक्षा माेठा शत्रू शेतकरी असल्याची भावना मोदी सरकारची असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

शेट्टी म्हणाले, की कर्जमाफीचे किचकट अर्ज शेतकऱ्यांच्या माथी मारून सरकारने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण केला. शेतकरी सन्मान योजना नसून ही शेतकरी अपमान योजना असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तीन वर्षांपूर्वी फुललेले कमळ चुरगाळून टाकण्याची वेळ आली आहे. ‘मन की बात’मधून मोदी उत्पादन वाढवायला सांगतात. दुसरीकडे शेतीमाल आयात करतात. मोदींना हलविण्याची ताकद फक्त शेतकऱ्यांमध्ये असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

Web Title: niphad nashik news raju shetty talking