आम्हाला चर्चा नको, निर्णय हवा : नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नाशिक : गुन्हेगाराला कोणताही जात-धर्म नाही. मात्र, राज्यात जातीय तेढ निर्माण करून सामाजात दंगली घडविण्याचे कटकारस्थान भाजप सरकार करीत असल्याचा आरोप करीत, कधी नव्हे ती मराठा समाजाला राज्यात असुरक्षितता वाटते आहे. मराठा समाजाच्या मोर्चाबाबत मुख्यमंत्री अद्यापही गंभीर नसून केवळ चर्चेसाठी निमंत्रणे देत आहेत. परंतु, आम्हाला चर्चा नको तर ठोस निर्णय हवा असल्याची ठाम भूमिका कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मांडली.

तळेगाव-अंजनेरी येथील चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर नीतेश राणे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मराठा क्रांती मोर्चा यासह अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आगीत तेल ओतल्याची भूमिका निभावली आहे. त्यांच्या वक्‍तव्यानंतर जिल्ह्यात दंगल उसळली आणि त्यानंतर पालकमंत्री मुंबईला पळून गेले. भाजप सरकारनेच ही दंगल घडवून आणत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केल्याचा थेट आरोप करीत, यासंदर्भात येत्या अधिवेशनामध्ये पालकमंत्र्यांना जाब विचारला जाणार आहे. तेथून मात्र ते पळू शकणार नाहीत, असे नीतेश राणे म्हणाले.

"चित्रपटासाठी मुख्यमंत्र्यांची मांडवली'
मराठा आरक्षण व मूक मोर्चासंदर्भात राणे म्हणाले की, भाजपाची शिखरसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संविधानामध्येच आरक्षणाचा मुद्दा नाही. त्यामुळे राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षणच द्यायचे नाही. तशी इच्छाशक्तीही नाही. त्यामुळे आतापर्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाज मूक मोर्चा काढत आहे. मात्र, याचा पुढचा टप्पा उद्रेकाचा असेल हेही मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावे. मुख्यमंत्री एका क्षुल्लक चित्रपटासाठी मनसेच्या राज ठाकरे यांच्यासमवेत मांडवली करू शकतात मग, मराठ्यांच्या मोर्चासंदर्भात निर्णय घेण्यासाठी विलंब का होतोय, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.

"स्वाभिमानी' कधीही निवडणूक लढणार नाही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वाभिमानी संघटना निवडणूक लढवणार का, असे विचारले असता आमदार नीतेश राणे यांनी, स्वाभिमानी संघटना ही सामाजिक संस्था आहे. या संघटनेच्या माध्यमातून कोणतीही निवडणूक लढविली जाणार नाही. आपण कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहोत आणि कॉंग्रेसच्याच भूमिकेनुसार निवडणूक लढविली जाईल असे स्पष्ट केले.

Web Title: Nitesh Rane asks for firm decision by CM Devendra Fadnavis for Maratha Kranti Morcha