निजामपूरच्या आगामी सरपंच निवडीची उत्कंठा शिगेला

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 14 मे 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या आगामी सरपंचपदी नेमकी कोणाची निवड होते? याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. विद्यमान सरपंच साधना विजय राणे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यातच संपला असून, त्यांना कोअरकमिटीने दिलेली तीन महिन्यांची वाढीव मुदतही २१ मे रोजी संपुष्टात येत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते युसूफ सय्यद यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या आगामी सरपंचपदी नेमकी कोणाची निवड होते? याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. विद्यमान सरपंच साधना विजय राणे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यातच संपला असून, त्यांना कोअरकमिटीने दिलेली तीन महिन्यांची वाढीव मुदतही २१ मे रोजी संपुष्टात येत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते युसूफ सय्यद यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये निजामपूर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. त्यावेळी ठरल्याप्रमाणे पाच वर्षात चार सरपंच व पाच उपसरपंच नेमण्याचा कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला होता. त्यानुसार सतरापैकी किमान नऊ ग्रामपंचायत सदस्यांना अनुक्रमे सरपंच, उपसरपंचपदाची संधी देण्याचा निर्णय झाला. बिनविरोध सरपंचपदाचा व उपसरपंचपदाचा पहिला मान अनुक्रमे अजितचंद्र शाह व दिलनूरबी सय्यद यांना देण्यात आला होता. त्यानंतर ठरलेल्या मुदतीप्रमाणे तत्कालीन सरपंच अजितचंद्र शाह व उपसरपंच दिलनूरबी सय्यद यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंचपदी रजनी रमेश वाणी यांची बिनविरोध निवड झाली होती.

दरम्यान सरपंच निवडीवरून कोअरकमिटीतही मतभेद निर्माण झाल्याने विद्यमान सरपंच साधना राणे यांनी कोअरकमिटीचा आदेश झुगारून सदस्यांची जमवाजमव केली. त्यांची अकरा विरुद्ध सहा मतांनी सरपंचपदी निवड झाली होती. तर उपसरपंचपदी अनिता विशाल मोहने यांची निवड झाली होती. कोअर कमिटीत ज्येष्ठ नेते ऍड. शरदचंद्र शाह, बाळूशेठ विसपुते, डॉ. रमाकांत शिरोडे, दत्तात्रय वाणी, अरुण वाणी, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, चंदूलाल जाधव, लियाकत सय्यद आदींचा समावेश आहे. परंतु सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य जर कोअरकमिटी सदस्यांचे ऐकत नसतील तर कोअरकमिटी गठीत करून उपयोग काय.? असा सर्वसामान्यांचा सवाल आहे. आगामी सरपंच निवड कोअरकमिटीच्या निर्णयानुसार बिनविरोध होते की सदस्यांची जमवाजमव करून संख्याबळाच्या आधारे मतदानाने होते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.

इच्छुकांमध्ये चुरस...
सद्या निजामपूर ग्रामपंचायतीत पाच वाणी, तीन मुस्लिम, तीन भिल्ल, दोन भोई, एक गुजराथी, एक मराठा, एक कुंभार, तर एक मातंग समाजाचा सदस्य आहे. त्यातही सामाजिक प्रतिनिधित्वाचा प्रश्न येतोच. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य सलीम पठाण, दिलनूरबी सय्यद, जाकीर तांबोळी यांच्यापैकी एकाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडू शकते. तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत सदस्य परेश वाणी यांनीही सरपंचपदावर दावा केला आहे. सदस्य रवींद्र वाणी, प्रवीण वाणी यांच्याही नावाची चर्चा आहे. उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य दीपक देवरे, कमलबाई मोरे, मालुबाई शिरसाठ, सुनील बागले आदींच्या नावाची चर्चा आहे.

"जोपर्यंत चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून हाती घेतलेली बुराई प्रकल्प पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारी, रस्ते आदी विकासकामे पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आपण राजीनामा देणार नाही."
- साधना राणे, सरपंच, निजामपूर ता.साक्री.

"ह्यावेळी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देणे गरजेचे असून ग्रामपंचायत सदस्या दिलनूरबी सय्यद, सदस्य सलीम पठाण, जाकीर तांबोळी यांच्यापैकी एकास संधी मिळाली पाहिजे."
- युसुफ सय्यद, सामाजिक कार्यकर्ते, निजामपूर.

"आपल्याला हल्ली अकरा सदस्यांचा पाठिंबा असून आपणच सरपंचपदाचे खरे दावेदार आहोत."
- परेश वाणी, ग्रामपंचायत सदस्य,निजामपूर

Web Title: nizampur gram panchayat new sarpan election