निजामपूरच्या सरपंच साधना राणे यांचा राजीनामा!

Nizampurs sarpanch Sadhna Rane resigns
Nizampurs sarpanch Sadhna Rane resigns

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता. साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना विजय राणे यांनी ठरल्याप्रमाणे सोमवारी (ता. 10) सायंकाळी गटविकास अधिकाऱ्यांकडे सरपंचपदाचा राजीनामा सोपविला. माजी उपसरपंच रजनी रमेश वाणी सूचक, तर माजी उपसरपंच दिलनूरबी सय्यद अनुमोदक होत्या. राजीनामा मंजूर झाल्यानंतर सरपंचपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

सत्तेसाठी वाटाघाटी...
ऑगस्ट 2015 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर कोअर कमिटी व ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सरपंचपदाची दीड वर्ष बिनविरोध 'पहिली टर्म' अजितचंद्र जगन्नाथ शाह यांना मिळाली होती. त्यानंतर मात्र फेब्रुवारी 2017 मध्ये कोअरकमिटीत व ग्रामपंचायत सदस्यांत मतभेद झाल्याने सदस्यांची जुळवाजुळव करून सरपंच साधना राणे यांनी 11 विरुद्ध 6 मतांनी 'विजय' मिळवून सरपंचपदाची 'दुसरी टर्म' हस्तगत केली. ठरल्याप्रमाणे त्यांचा दीड वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी हा राजीनामा दिला आहे.

मुस्लिम सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू...
सरपंचपदाची संधी एका वर्षासाठी मुस्लिम समाजाच्या सदस्याला देण्याचे ठरले होते. त्यानुसार माजी सरपंच सलीम पठाण, माजी उपसरपंच दिलनूरबी सय्यद व ग्रामपंचायत सदस्य जाकीर तांबोळी या तिन्ही सदस्यांनी सरपंचपदावर दावेदारी केली आहे. त्यातही सलीम पठाण व जाकीर तांबोळी यांची नावे आघाडीवर आहेत. याबाबत कोअरकमिटी व ग्रामपंचायत सदस्य हस्तक्षेप करणार नसल्याचे समजते. सलीम पठाण यांना काँग्रेसचे, तर जाकीर तांबोळी यांना क्वालिटी ग्रुपचे समर्थन असल्याची चर्चा सुरू होती. कोअर कमिटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य नेमके कोणाच्या पाठीशी उभे राहतात? हे येणारा काळच ठरवेल.

ग्रामपंचायतीतील जातीय बलाबल...
निजामपूर ग्रामपंचायतीत सामाजिकदृष्ट्या पाच वाणी, एक गुजराथी, तीन मुस्लिम, तीन भिल, दोन भोई, एक कुंभार, एक मातंग, एक मराठा असे एकूण सतरा सदस्य आहेत. त्यातही वाणी-गुजराथी समाजाला यापूर्वीच सरपंचपदाची संधी मिळाली असून आता मुस्लिम समाजाची दावेदारी आहे. उपसरपंचपदीही मुस्लिम, वाणी, भोई समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. उपसरपंचपदासाठी मालुबाई शिरसाठ, कमलबाई मोरे, सुनील बागले, दीपक देवरे आदींच्या नावाची चर्चा सुरू आहे.

सतरा सदस्यांचे पाठबळ नक्की कुणाला?
ग्रामपंचायतीत अजितचंद्र शाह, रजनी वाणी, साधना राणे, रवींद्र वाणी, प्रवीण वाणी, परेश वाणी, सलीम पठाण, दिलनूरबी सय्यद, जाकीर तांबोळी, सुनील बागले, इंदूबाई भिल, कासुबाई भिल, अनिता मोहने, सुनंदा बेंद्रे, मालुबाई शिरसाठ, कमलबाई मोरे, दीपक देवरे आदी सतरा सदस्यांचा समावेश असून त्यापैकी कोण कोणाला पाठबळ देतो? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.

कोअरकमिटी गठीत करून उपयोग काय?
कोअर कमिटीत ज्येष्ठ नेते अॅड. शरदचंद्र शाह, बाळूशेठ विसपुते, अरुण वाणी, दत्तात्रय वाणी, डॉ. रमाकांत शिरोडे, वासुदेव बदामे, चंदूलाल जाधव, लियाकत सय्यद आदींचा समावेश आहे. परंतु सरपंच-उपसरपंच निवड करताना जर ग्रामपंचायत सदस्य कोअरकमिटी सदस्यांचे ऐकत नसतील तर कोअर कमिटी गठीत करून उपयोग काय? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी सरपंच निवडीवरून कोअरकमिटी सदस्यांमध्येही मतभेद झाले होते.

'आमच्या दृष्टीने सलीम पठाण व जाकीर तांबोळी हे दोन्ही सदस्य तोलामोलाचे असून कोअर कमिटी सुचवेल तो उमेदवार आम्हाला मान्य राहील.' - युसुफ सय्यद, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी

'ज्येष्ठ सदस्य सलीम पठाण यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. पण त्यांनी आपल्यालाही सामंजस्याने किमान सहा महिने तरी सरपंचपदाची संधी दिली पाहिजे. अन्यथा बंडखोरी केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.' - जाकीर तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य

'कोअरकमिटीने यापूर्वी कोणत्याही सदस्याचे नाव जाहीर केले नसून केवळ 'मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व' असा शब्द दिला आहे. जर मुस्लिम सदस्यांमध्ये एकमत होत नसेल तर त्यांना किती सदस्यांचा पाठिंबा आहे? ते त्यांनी सिद्ध करावे. कोअरकमिटी त्यात हस्तक्षेप करणार नाही.' - अॅड. शरदचंद्र शाह, ज्येष्ठ नेते व कोअरकमिटी सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com