व्यवहार नव्हे एटीएमच होताहेत "कॅशलेस'! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

केंद्र सरकारने चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद केल्यानंतर सर्व व्यवहार कॅशलेस करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे. परंतु, निर्णयाच्या नऊ महिन्यानंतर देखील नागरिकांकडून होणारे व्यवहार हे रोखीने होत आहेेत. यामुळे "एटीएम'मधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढत असून, दोन तासात 52 लाख रूपयांचे ट्रान्झेक्‍शन होत असल्याने "एटीएम'च कॅशलेस होत आहे.

जळगाव: केंद्र सरकारने चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद केल्यानंतर सर्व व्यवहार कॅशलेस करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे. परंतु, निर्णयाच्या नऊ महिन्यानंतर देखील नागरिकांकडून होणारे व्यवहार हे रोखीने होत आहेेत. यामुळे "एटीएम'मधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढत असून, दोन तासात 52 लाख रूपयांचे ट्रान्झेक्‍शन होत असल्याने "एटीएम'च कॅशलेस होत आहे.

 नोटा बदलविण्याच्या निर्णयानंतर साधारण दीड- दोन महिन्यांपर्यंत सर्वच बॅंका व "एटीएम'च्या बाहेरही लांबलचक रांगा लागत असल्याचे चित्र होते. नोटबदलीच्या पार्श्‍वभूमीवर डिजीटलकडे वळताना जनतेने आपले बहुतांश व्यवहार कॅशलेस करण्याचे आवाहन केंद्र शासनाकडून करण्यात आले होते. सुरवातीचे काही दिवस नागरीकांनी कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला. मात्र, एटीएममधून रक्‍कम काढण्याची मर्यादा उठविल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती म्हणजे व्यवहार हे रोखीनेच व्हायला लागले. व्यवहार करण्यासाठी आजच्या स्थितीला नागरिक पैसे काढण्यासाठी "एटीएम'वर जात आहेत. परिणामी "एटीएम'मधील कॅश संपून जात असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून शहरात पाहण्यास मिळत आहे. 

दोन तासात "एटीएम'मध्ये खळखळाट 
दैनंदिन व्यवहार किंवा अन्य कोणताही व्यवहार करण्यासाठी आजही स्वॅप कार्ड किंवा चेकद्वारे व्यवहार करण्याचे प्रमाण कमी आहे. रोखीने व्यवहार होत असल्याने यासाठी लागणारा पैसा काढण्यासाठी नागरीक "एटीएम'वर जात आहे. दिवसातून पाच- सहा वेळेस कॅश टाकल्यानंतर देखील मशिनमध्ये कॅश राहत नसून, एका व्यक्‍तीकडून चाळीस हजार रूपयांपर्यंत कॅश काढली जात आहे. यामुळे दोन तासात सुमारे 52 लाख रूपयांचे ट्रान्झेक्‍शन होत असल्याचे "एसबीआय'कडून सांगण्यात आले. 
 
कॅशचा पुरवठाही कमी 
जिल्ह्यात होणारे व्यवहार लक्षात घेता त्यानुसार रिझर्व्ह बॅंकेकडून स्टेट बॅंकेला कॅशचा पुरवठा केला जात असतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बॅंकेकडून येणारी कॅश कमी असल्याने स्टेट बॅंकेकडून अन्य बॅंकांना दिवसाला केवळ 10 ते 20 लाख रूपयांची कॅश दिली जात आहे. यामुळेच एटीएममध्ये देखील पुरेशी रक्‍कम टाकली जात नसल्याने काही तासातच मशिन कॅशलेस होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: NO cash in ATM