नाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ

chaganbhujbal
chaganbhujbal

नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी भाजप-शिवसेनेवर केला. "कुठं नेऊन ठेवलं नाशिक' असं म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आल्याचे त्यांनी म्हटले. 

जागतिक विचारसंहिता असलेल्या सिटी मेयर्स फाउंडेशनच्या नोव्हेंबर 2011 मधील सर्वेक्षणानुसार "वाइन कॅपिटल ऑफ इंडिया' देशात चौथ्या क्रमांकावर, तर जगात सोळाव्या स्थानी होते. मात्र, ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सच्या अहवालानुसार नाशिकची जागा आता नागपूरने पटकावली आहे. यासंबंधाने श्री. भुजबळ म्हणाले, की एकेकाळी विकासाची गंगा वाहणाऱ्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिक शहराला दृष्ट लागली असून, गेल्या चार वर्षांपासून नाशिकच्या विकासाचा वेग इतका मंदावला आहे, की पुढील काळात नाशिककरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत दळणवळणाच्या अनुषंगाने यापूर्वी केलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांच्या देखभालीकडे केलेले दुर्लक्ष, नाशिकच्या औद्योगीकरणाचा मंदावलेला वेग, कृषिप्रक्रिया उद्योगाला न मिळालेली चालना, जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीकडे सत्ताधाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष, ही कारणे नाशिकच्या पीछेहाटीला कारणीभूत ठरली. 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांकडे द्यावे लक्ष 
राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प साकारण्यात आले. त्यांची सध्या काय परिस्थिती आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिकमधील पर्यटनवृद्धीसाठी मी पाठपुरावा करून निर्माण केलेले गंगापूर धरण परिसरातील मेगा पर्यटन संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोट क्‍लब, मनोरंजन पार्क, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडासंकुल, कलाग्राम, अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट यांसह पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प 2014 पर्यंत साकारण्यात आले. मात्र, सध्या हे प्रकल्प धूळखात पडले आहेत. "न भूतो न भविष्यति' असे हे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी सत्ताधारी सरकारला वेळ नाही, अशीही टीका श्री. भुजबळ यांनी केली. 

ते म्हणाले, की नाशिकच्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात सवलत देण्यात आली. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून, त्याचा फटका जिल्ह्यातील कामगार व रोजगारावर झाला आहे. अशा अनेक कारणांमुळे नाशिक शहर व जिल्ह्याचा विकास खुंटला. 

नाशिककरांचे काय पळविले... 
नाशिककरांचे काय पळवून नेण्यात आले, यावर भुजबळ यांनी बोट ठेवले आहे. त्या बाबी अशा ः 
- क्रीडा प्रबोधिनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी व बोट क्‍लबमधील बोटी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पळविल्या 
- नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गंगापूर धरणावर उभारलेल्या बोट क्‍लबसाठी अमेरिकेतून आणलेल्या काही बोटी सारंगखेड्याला पळविल्या 
- नाशिकमध्ये पाणी नसल्याचे कारण देऊन दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातून नाशिकला वगळले 
- वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक हे वर्षानुवर्षांपासून नाशिकला असणारे कार्यालय डिसेंबर 2015 मध्ये नागपूरला पळविले 
- एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करण्याचा आणि येथील प्रस्तावित 660 मेगावॉटचा प्रकल्प स्थलांतरित करण्याचा प्रयत्न 
- एकलहरे येथील स्थापत्य विभागाचे कार्यालय पारस (भुसावळ) येथे ऑक्‍टोबर 2016 मध्ये स्थलांतरित केले 
- नाशिककरांची मागणी असलेल्या नायपर संस्थेसाठी नाशिकला टाळून नागपूरला प्राधान्य देण्यात आले 
- चितेगाव (ता. निफाड) येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकासचे मुख्यालय व संशोधन केंद्र मे 2016 मध्ये दिल्लीला हलविले 
- नाशिक जिल्ह्याचा कोकण विभागात समावेश करून नोव्हेंबर 2016 मध्ये महावितरणचे मुख्यालय स्थलांतरित केले. 

उपमुख्यमंत्री असताना 2009 मध्ये नाशिक येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नाशिक विकास पॅकेज मंजूर करून घेतले होते. त्या पॅकेजमधील कृषी विभागाचे टर्मिनल मार्केट, दादासाहेब फाळके चित्रनगरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक कॅम्पस, मेगा फूडपार्कअंतर्गत वडगाव पिंगळा (ता. सिन्नर) येथील अन्नप्रक्रिया उद्योग यांसह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. 
- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com