सार्वजनिक उत्सवांत "डीजे' बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

सार्वजनिक उत्सवांदरम्यान शांतता राहावी, धार्मिक भावना दुखावू नयेत व धुळे शहर पोलिस प्रशासनाचा व्याप कमी होऊन शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत व्हावी म्हणून संघटनेतर्फे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले

धुळे - लग्नसराईत साउंड व "डीजे'धारकांना पोलिस प्रशासनाकडून सहकार्य मिळाले. त्यामुळे शहरातील बेरोजगारीचा प्रश्‍न सुटला. याबाबत पोलिस प्रशासनाचे आभार मानत आगामी काळात होणाऱ्या सार्वजनिक उत्सवांत "डीजे' न वाजविण्याचा निर्णय डीजे चालक- मालक संघटनेने घेतला.

जिल्ह्यातील सर्व साउंड, डीजे चालक-मालक संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष ललित वाघ, मार्गदर्शक सचिन शेवतकर, प्रवीण धनगर, विकी चौधरी, भूषण गोसावी, प्रसाद परदेशी, कल्पेश पगारे, दिनेश कापडे, विलास धात्रक उपस्थित होते.

जिल्ह्यात सार्वजनिक उत्सवांत जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या दबावापोटी "डीजे'धारकांकडून आवाजाच्या मर्यादेचे तसेच वेळेच्या बंधनांचे उल्लंघन होते. शहरातील प्रमुख मार्गांवर ध्वनिप्रदूषण जास्त प्रमाणात होत असल्याने पोलिस प्रशासनालाही खूप त्रास होतो. पोलिसांकडून साउंड/डीजेधारकांवर कारवाई केल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून सहकार्याची भावना मुळीच नसते. शहरात सार्वजनिक उत्सवांदरम्यान शांतता राहावी, धार्मिक भावना दुखावू नयेत व धुळे शहर पोलिस प्रशासनाचा व्याप कमी होऊन शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत व्हावी म्हणून संघटनेतर्फे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: no DJ in Public festivals