चोरी न झालेले गाव गुरेवाडी

आनंद बोरा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

आमच्या गावातील वाघे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. मी कलावंत असून, माझे कार्यक्रम राज्यभरात होतात. जुनी परंपरा टिकावी यासाठी मी प्रयत्न करीत आहे.
- एकनाथ जाधव, कलावंत

नाशिक - नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले गुरेवाडी (ता. सिन्नर) गाव. गावात गुरव बांधवांची संख्या मोठी असल्याने गावाला गुरेवाडी हे नाव मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात चोरी झाली नसल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. 

गावात अहिल्यादेवी होळकरांची बारव आहे. दुष्काळी गाव पाणी मिळाल्याने आता बागायती होत आहे. पूर्वी गावात तमाशा कलावंत होते. (कै.) नाना जाधव हे तमाशा कलावंत जिल्ह्यात प्रसिद्ध होते. गावात चिंच आणि भेंडीची अनेक झाडे आहेत. गावात भिल्ल समाज मोठा आहे. या समाजाने आपल्या कलागुणांना व्यासपीठ देत कला राज्यभर पसरवली. चारशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावात हनुमान, काशीआई देवी, तुळजाभवानी, गणेश ही मंदिरे आहेत. पूर्वीच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गावातील ज्येष्ठ कलावंत एकनाथ जाधव यांचे कार्यक्रम राज्यभर होतात. ते आता नवीन पिढीला आपली कला शिकवतात. देवराम कथने, नवनाथ कुराडे, दत्तू बर्डे, पुंजा माळी हे गीतगायन करतात. दत्तू बराडे संबळवादन करतात. गावाला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी भेट दिल्याची आठवण ग्रामस्थ सांगतात.

बारवची बिकट अवस्था
बारवची अवस्था सध्या बिकट आहे. तिच्या संवर्धनाची मागणी ग्रामस्थ करत आहेत. गावाच्या बाजूने कोलती नदी वाहते. गावाला सोळा गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पिण्यासाठी पाणी मिळते. भोजापूर धरणापासून ते मुसळगाव पाइपलाइनमधून गावाला पाणी दिले जाते. गावात घरकुल योजनेचे काम मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. गावात प्राथमिक शाळा आहे. मात्र, ग्रामस्थांना व्यायामशाळा नसल्याचे दुःख आहे. इथला मुख्य व्यवसाय शेती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Theft in gurewadi village