कर्णकर्कश प्रचाराने विद्यार्थ्यांमध्ये घबराट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

काय सांगते आचारसंहिता? 
चौकामध्ये थांबलेल्या वाहनावरील भोंग्यांवरून प्रचार करायला हरकत नाही. पण नेमक्‍या याच मुद्द्याला राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी हरताळ फासलाय. फिरत्या रंगमंचसारखे एका पक्षाच्या उमेदवारांचे वाहनावरील भोंगा वाजून गेल्यावर लगेच पाठीमागून इतरांची वाहने भोंगा वाजवत धावताहेत. बरं हे राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहिती नाही काय? की गेंड्याची कातडी डोळ्यावर ओढून झोपेचे सोंग घेतलेल्या यंत्रणेला दिसत नाही? साऱ्या जणांनी बघ्याची भूमिका घेतल्याने त्यात विद्यार्थी भरडले जाताहेत. 

  • आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन 
  • भोंगा वाजवणाऱ्याला मत नाहीच 
  • संतप्त नाशिककरांच्या प्रतिक्रिया;
  • प्रचारगाड्यांमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा वाजविला बँडबाजा 

नाशिक : निवडणूक प्रचारासाठी शनिवारच्या औद्योगिक सुटीसह आजच्या सार्वजनिक सुटीची पर्वणी साधण्यासाठी उमेदवारांनी आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन केले. त्यामुळे आचारसंहिता पथके गेली कुठे, असा प्रश्‍न निर्माण झालाच. शिवाय चालत्या वाहनांवरील भोंग्यांद्वारे होणाऱ्या प्रचाराच्या भडिमारातून उमेदवारांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अभ्यासाचा बँडबाजा वाजवलाय. संतापलेल्या नाशिककरांनी याच पार्श्‍वभूमीवर "भोंगा वाजवेल त्याला देणार नाही मत' अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदविल्या. 

प्रभागनिहाय ध्वनिप्रदूषणाचा नवा प्रश्‍न शहरामध्ये तयार झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आचारसंहिता पथके नेमके कधी लक्ष देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हातभार लावणार आहेत, असा प्रश्‍न पालकांपुढे तयार झाला आहे. जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. 13) होणाऱ्या माघारीनंतर चोवीस तासांमध्ये असेच काहीसे रणकंदन ग्रामीण-आदिवासी भागामध्ये पाहावयास मिळणार आहे. 
शहरामध्ये उमेदवारांच्या भोंगा लावून प्रचारासाठी धावणाऱ्या वाहनांची संख्या पाचशेच्या पुढे पोचली आहे. एका वाहनास प्रभागामध्ये फिरविण्यासाठी दिवसाला हजार रुपये हातावर ठेवावे लागतात. त्यातील साधारणपणे दोनशे रुपयांचे इंधन गाडीत टाकले जाते. उरलेली रक्कम ही गाडी-भोंग्याचे भाडे, चालकाचे वेतनासाठीचे ठरलेले असते. पाच लाखांच्या व्यवहारातून पाऊण लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना वेठीला धरले गेले आहे. 

विद्यार्थ्यांची संख्या 
दहावी
: नाशिक विभाग- दोन लाख 12 हजार 576 (नाशिक शहर-जिल्हा- 96 हजार 730) 
बारावी : नाशिक विभाग- एक लाख 68 हजार 287 
नाशिक शहर-जिल्हा- 74 हजार 719) 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांची प्रचंड संख्या आणि मर्यादित अवधी यामुळे आतापासूनच प्रचार शिगेला पोचल्याचे चित्र रंगविले जात आहे. इयत्ता दहावी-बारावीच्या महत्त्वपूर्ण परीक्षा आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांकडेही कानाडोळा करून "सैराट' झालेल्या प्रचारामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरू लागली आहे. गल्लोगल्ली भोंग्यांचे कर्णकर्कश आवाज घुमू लागल्याने "भोंगा वाजवेल त्याला मतच द्यायचे नाही,' अशा टोकाच्या प्रतिक्रिया वैतागलेले नागरिक व्यक्त करू लागले आहेत. 

नाशिकमध्ये महापालिका निवडणूक आणि जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंधरा पंचायत समित्यांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. नेमक्‍या परीक्षांच्या काळातच होत असलेल्या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांची मात्र कोंडी झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने आणि स्थानिक पातळीवर पोलिस व जिल्हा यंत्रणेनेही राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीतील चुरस पाहता सर्वांनाच आक्रमक प्रचार करणे क्रमप्राप्त ठरत आहे. परिणामी प्रचाराच्या पारंपरिक पद्धतीला सोशल मीडयाची जोड असूनसुद्धा रस्त्यारस्त्यांवर वाहनांवर भोंगे लावून कर्णकर्कश आवाजात गाणी, विविध घोषणा ऐकायला मिळत आहेत. प्रचाराच्या या भडिमारात विद्यार्थ्यांचे मात्र मोठे नुकसान होत असून, पालकदेखील वैतागले आहेत. त्यातूनच "भोंगा वाजवेल त्याला मतच द्यायचे नाही', अशा टोकाच्या निर्णयाप्रत नागरिक पोचू लागले आहेत. 

अनेकदा एकाग्रतेसाठी गच्चीवर अभ्यास करावा लागतो. पण दिवस उजाडल्यापासून रात्रीपर्यंत एकामागून एक भोंग्याची वाहने धावतात. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे मुश्‍कील झाले आहे. 
- शुभम वाघ (विद्यार्थी) 
 
अभ्यास करताना प्रचाराच्या भोंग्यांनी सतावले आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते दार वाजवून पत्रके वाटतात. अशा वेळी अनेकदा अभ्यास सोडून उठावे लागते. 
- पूजा वैद्य (विद्यार्थिनी) 

प्रचारांचे भोंगे वारंवार ऐकू येत असल्याने माझ्या भावाला अभ्यासात लक्ष देता येत नाही. त्यामुळे अशा प्रचाराला बंदी आणायला हवी. 
- सागर सोनवणे (विद्यार्थ्याचा मोठा बंधू) 

प्रचारांचे भोंगे इतके कर्कश आहेत, की त्यामुळे आपसात काय बोलतोय हेच आम्हाला कळत नाही. मुले अभ्यास कसा करत असतील याचा विचार न केलेला बरा. जो भोंगा वाजविणार नाही त्याला मत देण्याचे ठरविले. 
- भूषण वरखेडे (पालक) 

दुपारच्या वेळी अभ्यासासाठी शांतता असते. पण नेमके त्या वेळी प्रचारांचे भोंगे धावत असल्याने मुलांच्या अभ्यासाचे पूर्ण गणित कोलमडत आहे. 
- हेमंत चव्हाण (पालक) 

मुलाची बारावीची परीक्षा आहे. दिवसभर कानठळ्या बसतील अशा आवाजात प्रचाराची गीते वाजवत धावतात. ज्यांच्यामुळे त्रास होतो त्यांना मतदान कसे करायचे? 
- मनीषा परदेशी (पालक) 

कसल्याही प्रकारची शिस्त प्रचारात राहिली नसल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. त्यामुळे गोंगाट करून मते मागणाऱ्यांना मते द्यायची काय, असा प्रश्‍न पालकांपुढे तयार झाला आहे. 
- सारिका कडलग 

ध्वनिप्रदूषणामुळे कधी प्रचार संपतो असे वाटायला लागले आहे. घरात आजारी कुटुंबीय असल्यामुळे विनंती करूनही कुणी थांबण्याचे नाव घेत नाही. 
- नलिनी बागूल 

कंपनीच्या मेसेजप्रमाणे आता हे उमेदवारांचे मेसेज नकोसे झाले आहेत. हे कमी काय म्हणून परीक्षेच्या कालावधीत उमेदवारांच्या प्रचाराने नाकी नऊ आणले आहेत. 
- स्वाती ठाकरे 

माझ्या दोन्ही मुलींच्या परीक्षा सुरू आहेत. पण प्रचारगाड्यांमुळे आता त्यांना रात्रीच्या वेळी अभ्यास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या उमेदवारांना मते द्यायची नाहीत हे जणू पालकांनी ठरवून ठेवले आहे. 
- पुष्पा वाबळे 

Web Title: noise pollution of election campagin disturbs students

व्हिडीओ गॅलरी