नॉन-कॅपद्वारे प्रवेशाची पुन्हा संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

‘वैद्यकीय’चे पसंतीक्रम भरण्यास सुरवात
मुंबई - पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशासाठी राज्यभरातून ६९ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४३ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम ११ जुलैपर्यंत भरता येतील.

नाशिक  - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र शाखांसह अन्य विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असली, तरी कॅप राउंडकरिता अर्ज करण्याची मुदत संपली आहे. मात्र, १४ ऑगस्टपर्यंत ‘नॉन-कॅप’अंतर्गत राखीव जागांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध असेल. हव्या त्या महाविद्यालयातील राखीव कोट्यासाठी याअंतर्गत अर्ज करता येणार असला, तरी शिष्यवृत्तीसह अन्य शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

बी.ई./बी.टेक. या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसह बी. फार्म. या औषधनिर्माणशास्त्रातील पदवी अभ्यासक्रम, एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी पहिल्या कॅप राउंडच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयाची नोंद करायची आहे. यानंतर गुणवत्तेच्या आधारे पहिली निवड यादी जाहीर होणार आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॅप राउंडच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज दाखल करणे आवश्‍यक असते. परंतु, काही कारणास्तव अर्ज न भरू शकलेल्यांना थेट पुढील वर्षाची वाट बघायला लागू नये, यासाठी नॉन-कॅपकरिता राखीव जागांवर प्रवेश मिळविण्याची संधी उपलब्ध असेल. बहुतांश अभ्यासक्रमांसाठी या जागांकरिता अर्जाची मुदत १४ ऑगस्टपर्यंत आहे.

शिष्यवृत्तीला मुकावे लागणार
कॅप राउंडमार्फत प्रवेश घेणाऱ्यांना त्यांच्या प्रवर्गनिहाय शिष्यवृत्ती योजनेसह अन्य योजनांचा लाभ घेता येणार आहे. परंतु, कॅप राउंडव्यतिरिक्‍त अन्य माध्यमातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांपासून मुकावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

काही कारणास्तव अर्ज भरायचा राहिला असल्यास कॅप प्रक्रियेव्यतिरिक्‍त पुन्हा एकदा अर्ज भरण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. याअंतर्गत त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयाची निवड करण्याची संधी असली, तरी शासकीय योजनांचा लाभ मात्र घेता येणार नाही.
- डॉ. नीलकंठ निकम, प्राचार्य गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-Caps Admission opportunity again Education Student