नोटांचे विमुद्रीकरण नव्हे, नव्याने मुद्रीकरण - डॉ. किरण देसले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

जळगाव - केंद्र सरकारने सध्या पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे. नोटांचे विमुद्रीकरण झाल्याने ही तात्पुरती समस्या निर्माण झाली आहे. मात्र, खरेतर हे नोटांचे विमुद्रीकरण नसून नव्याने मुद्रीकरण असल्याचे मत अर्थतज्ज्ञ डॉ. किरण देसले यांनी व्यक्त केले.

जळगाव - केंद्र सरकारने सध्या पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे. नोटांचे विमुद्रीकरण झाल्याने ही तात्पुरती समस्या निर्माण झाली आहे. मात्र, खरेतर हे नोटांचे विमुद्रीकरण नसून नव्याने मुद्रीकरण असल्याचे मत अर्थतज्ज्ञ डॉ. किरण देसले यांनी व्यक्त केले.

दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे आज ‘नोटांचे विमुद्रीकरण आणि भारताचे भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यान ते बोलत होते. याप्रसंगी आयएमआर कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेक काटदरे उपस्थित होते. चलनातून पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यामुळे आता काय बदल होतील? सामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतील? खरंच काळा पैसा बाहेर येणार का? स्विस बॅंकेतील पैशांचे काय? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘दीपस्तंभ’तर्फे सदर व्याख्यानाचे आयोजन केले होते. 

डॉ. देसले म्हणाले, की आज नोटांवर विश्‍वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करणे आवश्‍यक आहे. कॅशलेस व्यवहार वाढला पाहिजे. नोटा बंद करण्याचा निर्णय तत्काळ घेतला नसून फार विचार करून घेतल्याचे ते म्हणाले. विदेशी बॅंका आणि मालमत्तेतील पैशांचे विमुद्रीकरण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नोटा रद्दने विनाकारण गोंधळ होत आहे. आपल्याकडे पैसे असतील तर कितीही पैसे जमा करू शकता. त्यामुळे सबुरी आवश्‍यक आहे.

दृष्टिकोन बदलावा - डॉ. काटदरे
पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा; पैसा हा काल्पनिक आहे, पैशाला पैसे म्हणण्यासाठी मान्यतेची गरज आहे. आपण प्रत्यक्ष गोष्टींपेक्षा अप्रत्यक्षातील गोष्टीला जास्त महत्त्व देत असतो. त्यामुळेच असे गोंधळाचे प्रकार घडत असल्याचे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व व्याख्याते तथा आयएमआर कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेक काटदरे यांनी व्यक्त केले. नोटा आपल्या देशाची संपत्ती नाही. सिस्टिम बदलणे आवश्‍यक आहे. सिस्टिममुळेच ब्लॅकमनी ही कन्सेप्ट उदयास आली आहे. टॅक्‍स न भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमनी तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांची मानसिकता सोन्याच्या भोवती गुरफटलेली असल्याने सोन्याचा व्यवहार अधिक करणे देखील चुकीचे आहे. व्याख्यान यशस्वितेसाठी अनिल भोळे, संदीप पाटील, रामचंद्र पाटील, नरेंद्र पाटील, अशोक बाविस्कर यांचे सहकार्य लाभले. जयदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Not currency demonetization, new monetization