नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा जनआक्रोश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नाशिक - नोटाबंदीनंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलने करण्याचा इशारा देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात तालुकानिहाय रास्ता रोको, तर शहरात धरणे धरण्यात आले. सर्वत्र काही काळ चक्काजाम करण्यात आला होता. 

नाशिक - नोटाबंदीनंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलने करण्याचा इशारा देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात तालुकानिहाय रास्ता रोको, तर शहरात धरणे धरण्यात आले. सर्वत्र काही काळ चक्काजाम करण्यात आला होता. 

नोटाबंदीमुळे उद्‌भवलेल्या अडचणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज जिल्हाभरात आंदोलन केले. जिल्ह्यात तालुकावार रास्ता रोको केले. नोटाबंदीपूर्वी कोणतीही पूर्वतयारी न केल्याने सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचे हाल सुरू असल्याचा आरोप करीत पदाधिकाऱ्यांनी, स्थिती सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. याप्रश्‍नी भविष्यात अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, तर शहरात शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

शहरात धरणे
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून नोटाबंदीचा निषेध करण्यात आला. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयंत जाधव, नाना महाले, कविता कर्डक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले. संजय खैरनार, अनिल परदेशी, मुक्तार शेख, दत्ता पाटील, पद्मा वाघ, भरत जाधव, वैभव देवरे, राजेंद्र वखारे, कुंदा सहाणे, किरण पारकर, किशोर शिरसाठ, मनोहर कोरडे, सुनील दातीर, रामभाऊ जाधव, संदीप महाले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

जिल्ह्यात रास्ता रोको
त्र्यंबकेश्‍वर येथील जव्हार फाटा (त्र्यंबकेश्‍वर), गिरणारे चौफुली (नाशिक), मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे चौफुली (इगतपुरी), पेठ बसस्थानक (पेठ), विंचूर चौफुली (येवला), कळवण बसस्थानकासमोर (कळवण), मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड चौफुली, नांदगावला मालेगाव चौफुली, देवळा येथील पाचकंदील चौफुली (देवळा), सटाणा येथील राज्य महामार्गावरील बसस्थानकासमोर (बागलाण), मालेगावला उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर (मालेगाव), सिन्नर बसस्थानकासमोर, नाशिक-सापुतारा राज्यमार्गावरील बोरगाव (सुरगाणा), नाशिक-वणी राज्यमार्गावरील पालखेड चौफुली (दिंडोरी), निफाड तालुक्‍यातील निफाड चौफुली (निफाड) येथे नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको झाला. युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, विष्णुपंत म्हैसधुणे, दिलीप थेटे, सोमनाथ खातळे, लीलाबाई गायधनी आदींच्या नेतृत्वाखालीही आंदोलन झाले.

Web Title: Notabandi against NCP