नोटाबंदीच्या शांतीनंतर निश्‍चितच क्रांती - जितेंद्र आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मालेगाव - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असूनही शांत आहे. शांती व अहिंसेतून निश्‍चितच क्रांती होते. ब्रिटिशांची हकालपट्टी व आणीबाणीनंतर झालेला सत्तापालट ही त्याची उदाहरणे आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांनी मुजोर सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे केले.

कॅम्प बालगंधर्व रंगमंदिरात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आमदार नरहरी झिरवाळ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर राजेंद्र भोसले, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, अरुण देवरे, धर्मा भामरे, आर. के. बच्छाव, दिनेश ठाकरे, सुनील वाजे, बाजार  समिती सभापती प्रसाद हिरे, शांताराम लाठर, चंद्रकांत गवळी आदी होते.

श्री. आव्हाड म्हणाले, की सत्ता सेवेचे साधन असल्याचा सत्तारूढ नेत्यांना विसर पडला. नाशिक जिल्हा पुरोगामी विचारात आघाडीवर आहे. राज्यात सर्वत्र शरद पवारांवर प्रेम करणारा जिल्हा असे सगळीकडे ऐकतो. या निवडणुकीत हा शब्द प्रत्यक्षात उतरावा. शरद पवार कृषिमंत्री असताना दहा वर्षे शेतकरी सुखाने जगला. आता तो त्रस्त झाला. शेतमाल मातीमोल जात आहे. पक्षाने ज्यांना मोठे केले ते क्षणात निष्ठा बदलतात याचे शल्य वाटते. देशाची अर्थव्यवस्था एक वर्ष मातीत घालण्याचे काम नोटाबंदीच्या निर्णयाने झाले. या निर्णयाबाबत रिझर्व्ह बॅंक व सरकारमध्ये समन्वय नव्हता. शेतमाल विक्रीतील साखळी, असंघटित कामगार, शेतकरी व सामान्य या निर्णयामुळे उद्‌ध्वस्त झाला. देशात धर्मद्वेष वाढतो आहे. ‘पाच कोस पे बदले वाणी और पानी’ ही विविधताच देशाची ओळख आहे. त्यावर हल्ला करण्याचे काम होत आहे. कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवावेत.

या वेळी श्री. भोसले, हिरे, झिरवळ, चव्हाण आदींची भाषणे झाली. विनोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याला महेश शेरेकर, प्रशांत पवार, मारुती शिंदे, बाळासाहेब बागूल, दीपक अहिरे, संदीप पाटील, केवळ हिरे, दशरथ निकम उपस्थित होते. संजय जाधव, विनायक कचवे, राहुल शेगर यांचा पक्षप्रवेशाबद्दल श्री. आव्हाड यांनी सत्कार केला. प्रशांत महाजन यांनी सूत्रसंचालन केले. योगेश निकम यांनी आभार मानले.

Web Title: Notabandi of peace after the revolution, surely - Jitendra Awhad