महिना उलटला, तरी रांगा संपता संपेनात..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

जळगाव - केंद्र शासनाच्या पाचशे हजारांच्या नोटा बंदीनंतर तब्बल एक महिना सहा दिवस उलटले, तरी बॅंका आणि एटीएमसमोरील रांगा बंद होण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. रांगा कमी होण्यास किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागेल, असे सांगितले जात आहे. नागरिकांकडे पुरेशी रोकड उपलब्ध नाही. परिणामी आता बॅंकेत पैशांसाठी रांगेत तासन्‌तास उभे राहण्याऐवजी एटीएम कार्डाद्वारेच अनेकांनी आपले व्यवहार करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. यामुळे बॅंकेतील, एटीएम समोरील रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचे बॅंकांचे म्हणणे आहे.

जळगाव - केंद्र शासनाच्या पाचशे हजारांच्या नोटा बंदीनंतर तब्बल एक महिना सहा दिवस उलटले, तरी बॅंका आणि एटीएमसमोरील रांगा बंद होण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. रांगा कमी होण्यास किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागेल, असे सांगितले जात आहे. नागरिकांकडे पुरेशी रोकड उपलब्ध नाही. परिणामी आता बॅंकेत पैशांसाठी रांगेत तासन्‌तास उभे राहण्याऐवजी एटीएम कार्डाद्वारेच अनेकांनी आपले व्यवहार करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. यामुळे बॅंकेतील, एटीएम समोरील रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचे बॅंकांचे म्हणणे आहे.

पाचशे हजारांच्या नोटबंदीबाबत सर्वत्र चर्चांचा फड रंगला आहे. निर्णय चांगला की वाईट, याबाबत अजूनही नागरिकांमध्ये मतभिन्नता आहे. मात्र सर्वसामान्यांना त्याची झळ पोचलेली दिसत आहे. जे मजूर रोजंदारीवर काम करतात, त्यांना वेतन यापुढे बॅंकेतून काढावयाचे असल्याने त्यांनाही बॅंक खाते उघडण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे उत्पन्नाचा दाखला देवून "झिरो बॅलन्स'वर खाते सुरू करण्याकडे त्यांचा कल दिसत आहे.

स्वॅपिंगचा वापर वाढला
नोकरदार, बहुतांश व्यापारी नेट बॅंकिंगचा वापर करू लागले आहेत; तर बहुतांश नागरिक एटीएम कार्डाचा वापर रोजच्या खरेदीसाठी करताना दिसत आहेत. सुपरशॉपवर खरेदी, कापड खरेदी, इतर वस्तूंच्या खरेदीसाठी स्वॅपिंगद्वारे पेमेंट करत आहेत. ज्या व्यापाऱ्यांकडे स्वॅपिंग मशिन आहेत, ते स्वॅपिंगद्वारे ग्राहकाकडून पेमेंट स्वीकारतात. मात्र, अर्ज करूनही अद्याप अनेक व्यापाऱ्यांना स्वॅपिंग मशिन मिळू शकले नाहीत, ते स्वॅपिंग मशिनच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक बॅंकांकडे अर्ज करूनही स्वॅपिंग मशिन मिळाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत.

कॉडलेस स्वॅपची मागणी नोंदविली
मोबाईल हॅण्डसेटला कनेक्‍ट करून व्यवहार करावयाचे सध्या स्वॅपिंग मशिन काही व्यापाऱ्यांना मिळाले आहे. अनेकांनी स्टेट बॅंकेकडे आपल्या स्वॅप मशिनच्या मागण्या नोंदविल्या आहेत. मोबाईल हॅण्डसेट कनेक्‍टऐवजी "कॉडलेस' स्वॅपिंग सोईचे असते. यामुळे लोखंड व्यापाऱ्यांनी कॉडलेस स्वॅप मशिनची मागणी केली असल्याची माहिती जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी दिली.

सुटीमुळे काल बॅंक, एटीएमसमोर गर्दी होती. मात्र सरासरी गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे. पुरेशी रोकड बॅंकांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे एटीएम समोरील गर्दी, दैनंदिन गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे.
उदय पानसे, उपमहाप्रबंधक, स्टेट बॅंक, जळगाव.

नागरिक म्हणतात...
रांगेत तीन दिवस रांगेत
सुनील जाधव ः गेल्या तीन दिवसांपासून शहरातील सर्व एटीएम बंदच होते. काल एटीएमवर पैसे काढण्यासाठी क्रमांक लावला. मात्र नंबर काही अंतरावर असतानाच एटीएममधील कॅश संपली होती. आज पुन्हा रांगेत उभा आहे. केव्हा संपणार या रांगा, असे झाले आहेत.

स्वॅप यंत्रे सर्वच ठिकाणी बसवा
योगेश निकम ः क्रेडिट कार्डाचा वापर सध्या करत आहे. मात्र अनेक ठिकाणी स्वॅपयंत्रे नाहीत. यामुळे रोख पैसेच द्यावे लागतात. रोकड काढण्यासाठी सुमारे सहा तास मी रांगेत उभा होतो, यात माझा वेळ गेला. कॅशलेस करायचे, तर सर्व ठिकाणी अगोदर स्वॅप यंत्राची व्यवस्था करायलाच हवी.

एटीएम बंदच
साऊद हुसेन ः आमचा उदरनिर्वाह व्यवसायावर आहे. एटीएम, बॅंकेतून पैसे काढण्यासाठी रांगा रोजच पाहतो. व्यवसाय करायचा, की रांगेत उभे राहून पैसे काढायचे असा प्रश्‍न आहे. बहुतांश एटीएम बंद असतात, त्याबाबत बॅंकांकडे तक्रारी केल्या तरी उपयोग नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर नियंत्रण ठेवावे.

पाचशेच्या नोटा उपलब्ध करा
रऊफ शेख ः नोटाबंदीने लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मात्र, आता हळूहळू परिस्थिती सुधारते आहे. दोन हजारांची नोट आली. पण, ग्राहकाने शंभराचे सामान खरेदी केले, तर इतर सुटे पैसे देताना अडचण येते. पाचशेच्या नोटा अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची गरज आहे.

Web Title: note ban crowd